Khed Taluka BJP Joinings
खेड: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेड येथे भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्ष संघटनाला बळ दिले.
या कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, वैभव खेडेकर भाजपमध्ये येत आहेत अशी बातमी पसरताच कोकणभर चर्चा सुरू झाली होती. ‘इकडे का तिकडे’ अशी रस्सीखेच सुरू झाली होती. मात्र मी त्यांना त्या वेळी सांगितले होते की, तुमच्याबद्दल आणि तुमच्या कार्यकर्त्यांबद्दल माझा पूर्ण सकारात्मक दृष्टिकोन आहे. प्रदेशातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोकणातूनही सर्वांनी त्यांना 100 टक्के गुण दिले. त्यामुळे त्यांच्या सवडीने पक्षप्रवेश होईल असे ठरविले होते आणि आज तो खेडमध्ये झाला.
चव्हाण पुढे म्हणाले, वैभव खेडेकर यांनी त्यावेळी सांगितले होते की अजूनही अनेक कार्यकर्ते पक्षात येऊ इच्छितात आणि हा कार्यक्रम खेडमध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे आज मी येथे आलो आहे. पक्षात दाखल झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख करताना ते म्हणाले, एक विचाराचं सरकार घडवणे ही काळाची गरज आहे. महापौर ते नगराध्यक्ष हे महायुतीचे असणे गरजेचे आहे. एकत्र विचाराच्या नेतृत्वाखालीच जनतेच्या हिताचे काम अधिक प्रभावीपणे होऊ शकते.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पुढे स्पष्ट संकेत देत सांगितले, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये एकविचाराचं, एकसंध नेतृत्व असणारे सरकार आणणे आवश्यक आहे. संघर्षाची परंपरा आम्हा सर्वांना आहे, आणि त्याच बळावर आपण पुढे जाऊ.
या कार्यक्रमात माजी आमदार सूर्यकांत दळवी, डॉ. विनय नातू, प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, केदार साठे आदी मान्यवर उपस्थित होते. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.