खेड : यंदा शेतकऱ्यांच्या भाताला 2369 रुपये क्विंटल दर निश्चित करण्यात आला असून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केले आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. वेरळ येथील संघाच्या गोदामात तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ भात खरेदी केंद्र सुरू केले असून त्याचा शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, संघातर्फे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यावर भर दिला जात आहे. यंदाही शेतकऱ्यांकडून भात खरेदी केला जाणार असून योग्य तो दर देण्यात आला आहे. या खरेदीसाठी खरीप सन 2025-26 पीक पेरा नोंद असलेल्या सात-बारा, आधारकार्ड, बैंक पासबुक झेरॉक्स आवश्यक आहे. भाताची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये मार्केटिंग फेडरेशनमार्फत जमा होणार आहे. तसेच याप्रसंगी शेतकऱ्याच्या आलेल्या अडचणी पीक पेरा नोंदणीसाठी येथील उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून येणाऱ्या अडचणीवर याबाबत चर्चा केली. याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष अरविंद आंब्रे, व्यवस्थापक सचिन कुळे, संघाचे संचालक विष्णू मोरे, शेखर दळवी, शामराव मोरे, प्रकाश कडू, प्रफुल्ल मोरे, सुजित भुवड, अंकुश कदम, विश्वास सुर्वे, उज्वला कदम, अकौंटंट तुषार कारंजकर, माजी सभापती विजयराव कदम आदी उपस्थित होते.