पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे बिरजेवाडी ते पूर्णगड यादरम्यान बांधण्यात आलेल्या खारभूमी बंधाऱ्यामुळे परिसरातील शेकडो एकर जमीन सुपीक बनलेली असताना वारंवार मच्छीमारीकरिता झडपे तोडली जात असल्यामुळे मोठ्याप्रमाणात खारे पाणी घुसत आहे. यामुळे परिसरातील अनेक जमिनी नापीक बनत चालल्या असून, पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागला असून परिसरामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. बंदराची झडपे तोडणाऱ्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गावडे आंबेरे, मावळंगे, नातुंडे, जांभूळ, आड आदी परिसरामध्ये पूर्णगड खाडीचे खारे पाणी मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे त्या परिसरातील शेकडो एकर जमीन नापीक बनत आहे. यामुळे त्यावर उपाय म्हणून शासनाच्या वतीने गावडे आंबेरे बिरजेवाडी ते पूर्णगड असा वीस वर्षापूर्वी खारभूमी खात्याच्या वतीने खारभूमी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. कारण या बंधाऱ्यामुळे या दोन्ही गावांना जोडणारा हा बंधारा सेतू बनला होता. तसेच नापीक बनलेल्या गावातील अनेक शेतकऱ्यांना आपली जमीन सुस्थितीमध्ये आणण्यासाठी मदत झाली होती. त्याचबरोबर परिसरामधील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची स्थिती सुधारल्यामुळे त्या विहिरींच्या पाण्याचा उपयोग येथील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उपयोग झाला होता.
या सर्व शेतकऱ्यांचा फायदा होत असताना परिसरातील मच्छीमारांच्या मासेमारीवरती विपरीत परिणाम झाल्यामुळे त्यांना या परिसरामध्ये मासेमारी करणे अवघड बनले होते. या पार्श्वभूमीवर वारंवार या बंधाऱ्याची झडपे तोडण्यात येत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यामुळे त्यावर ायमस्वरूपी उपाय करण्यात यावा, अशी मागणी संबंधित खात्याकडे या परिसरातील शेतकऱ्यांनी केल्यानंतर फोडण्यात आलेली झडपे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वारंवार त्याची दुरुस्ती करून जोडली जात होती. दोन वर्षांपूर्वी 15 ते 20 झडपांची दुरुस्ती करून चांगल्या प्रकारे झडपे बंदिस्त करण्यात आली होती. त्यामुळे खाडीतून येणारे भरतीचे खारे पाणी थांबवण्यास या झडपाना यश आले होते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात घुसणारे पाणी थांबले होते. याबद्दल शेतकऱ्यांनी खारभूमी खात्याचे आभार मानले होते, परंतु मच्छीमारीकरिता वारंवार झडपे तोडली जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घुसणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही झडपे तातडीने दुरुस्त करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे
यासंदर्भात शेतकरी योगेश केळकर म्हणाले की, या खारभूमी बंधाऱ्यामुळे आमच्या भागातील भात शेती, नारळ, सुपारी आदी लागवडीला चांगले दिवस आले होत.े तसेच पिण्याच्या पाण्याच्या विहिरीला मचुळ पाणी कमी होऊन पिण्यास योग्य पाणी निर्माण झाले होते, परंतु वारंवार झडपे तोडली जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खारे पाणी प्रत्येक भरतीवेळी या परिसरात घुसत आहे. या संदर्भात संबंधित खात्याला वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.