रत्नागिरी भैरी मंदिरात १ डिसेंबरला कालभैरव जयंती 
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्नागिरी भैरी मंदिरात १ डिसेंबरला कालभैरव जयंती

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; रात्री १२ वाजता उत्सवाची सांगता होणार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : श्री भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे रत्नागिरीचे बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात १ डिसेंबर रोजी कालभैरव जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

यानिमित्त सकाळी ७ वाजता बारा वाड्यांच्या वतीने श्री देव भैरीवर अभिषेक, ८ वाजता सत्यनारायण पूजा प्रारंभ, ८.३० वाजता कालभैरव याग (होम हवन), ९.३० वाजता दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील (नाचणे) साधक सामूहिक कालभैरव पठण, ११ वाजता आरती मंत्रपुष्प, दुपारी १२ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत खिचडी प्रसादाचे वितरण, दुपारी १२ ते १.३० यावेळेत श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ (आंबेशेत, बुवा शुभम सचिन वायंगणकर), दुपारी १.३० ते ३ या वेळेत श्री दुर्गामाता भजन मंडळ (कर्ले, बुवा सौ. नेहा शेट्ये) यांचे भजन, दुपारी ३ ते ४ यावेळेत हभप प्रविण मुळ्ये यांचे कीर्तन, सायंकाळी ५ ते ७ यावेळेत श्री जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ (कोतवडे, बुवा विजय मयेकर) यांचे भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.

तसेच सायंकाळी ७ ते ९ यावेळेत ‌‘भक्तीसंध्या- भक्तीमय गीतांचा सुरेल नजराणा‌’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये ‌‘सूर नवा ध्यास नवा‌’फेम सुप्रसिद्ध गायिका संपदा माने, सुप्रसिद्ध गायक ओंकार प्रभुघाटे गीते सादर करणार आहेत. या कार्यक्रमात संवादिनी साथ चैतन्य पटवर्धन, तबला निखिल रानडे, पखवाज मंगेश चव्हाण, तालवाद्य अद्वैत मोरे करतील व निवेदन कौस्तुभ सरदेसाई करणार आहेत.

रात्री ९ ते १० यावेळेत श्री सिद्धिविनायक चक्री भजन मंडळाचे (बुवा सचिन टिकेकर, रत्नागिरी) भजन, रात्री १० ते १२ पर्यंत पारंपरिक श्री दत्त प्रासादिक भजन मंडळाचे भजन (बुवा सुदेश नागवेकर, घुडेवठार), रात्री १२ वाजता आरती होऊन कालभैरव जयंती उत्सवाची सांगता होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT