Kalambani Sub District Hospital Bribery Case
खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिनांक ९ जून २०२५ रोजी, एका मृत व्यक्तीच्या शवविच्छेदनासाठी सफाई कामगाराने नातेवाईकांकडून एक हजार रुपये लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त करत वैद्यकीय अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर १२ जून रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी सगरे यांनी संबंधित कर्मचारी राजू वाघेला याच्याकडून लेखी खुलासा मागवला. मात्र, १३ जून रोजी सादर केलेला खुलासा असमाधानकारक ठरला असून, या प्रकरणाबाबत पुढील कारवाईसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत खडोळ यांनी दिली. या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासनात तसेच स्थानिक पातळीवर एकच खळबळ उडाली आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कळंबनी उपजिल्हा रुग्णालय हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र रुग्णालयात वैद्यकीय तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवत आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी वरिष्ठ पातळीवर या कमतरतेबाबत वारंवार लेखी निवेदने दिली असतानाही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत, अशी तक्रार आहे.
MBBS वैद्यकीय अधिकारी: मंजूर – ७, त्यापैकी ५ पदे रिक्त
तज्ञ डॉक्टर: अस्थिरोग, सर्जन (जनरल), नेत्ररोगतज्ञ, भूलतज्ञ – सर्व पदे रिक्त
उपलब्ध तज्ञ डॉक्टर (स्थायी): स्त्रीरोगतज्ञ – १, सर्जन – १, बालरोगतज्ञ – १, भूलतज्ञ – १
कंत्राटी (NHM) डॉक्टर: MBBS – ५, भूलतज्ञ – १, सर्जन – १
कार्यालयातील रिक्त पदे: सहाय्यक अधिक्षक – १, वरिष्ठ लिपिक – १, कनिष्ठ लिपिक – १, बाह्यारुग्ण लिपिक – ३
ईतर रिक्त पदे: परिसेविका – ३, अधिपरिचारिका – १, वाहन चालक – १, कक्षसेवक – २, शस्त्रक्रिया परिचर – १, सफाई कामगार – ८ पदे रिक्त
या गंभीर परिस्थितीमुळे रुग्णसेवा, अपघात व्यवस्थापन आणि कार्यालयीन कार्यकाज ठप्प होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेले कर्मचारी प्रचंड तणावाखाली काम करत आहेत. अशा परिस्थितीत कर्मचारी पैसे मागत असल्याच्या तक्रारीमुळे रुग्णालय व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने लक्ष घालून रिक्त पदे भरावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.