खेड : मुसळधार ढगफुटी पावसामुळे शिवतर ते नामदरे वाडीकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णतः खचला असून, सध्या वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला आहे. दर्याखोर्यातून आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे रस्त्यालगतचे नाले आणि मोर्या तुंबल्यामुळे रस्त्यावर गाळ आणि माती साचली आहे. परिणामी, या भागातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. या परिस्थितीची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अरुण कदम यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत संबंधित अधिकार्यांना तातडीने बोलावून कामाची पाहणी केली.
यावेळी शिवतर आणि नामदरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्यासंख्यने उपस्थित होते. सभापती अरुण कदम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत या मार्गाची तातडीने डागडुजी करून वाहतूक सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, पावसामुळे झालेल्या इतर नुकसानीचाही आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.