खेड : राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत असताना रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला मात्र केवळ पाच नियुक्त्या आल्या आहेत. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोठी कमतरता असताना झालेल्या या अत्यल्प नियुक्त्यांमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, रुग्णांची मोठी संख्या असलेल्या खेड, दापोली आणि चिपळूण येथील उपजिल्हा रुग्णालयांना एकही वैद्यकीय अधिकारी देण्यात आलेला नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मोठे जाळे आहे. दापोली, चिपळूण आणि खेड येथे उपजिल्हा रुग्णालये आहेत. कामथे आणि कळंबणी येथील रुग्णालयांसह राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, देवरूख, गुहागर आणि मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयांवर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यसेवेची जबाबदारी आहे. याशिवाय जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून ग्रामीण भागाला आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. मात्र, अनेक ठिकाणी पुरेसे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नव्याने करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये गुहागर येथे दोन, रायपाटण येथे एक, जिल्हा शासकीय रुग्णालयात एक आणि गुहागरातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात एक अशा एकूण ५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील महत्त्वाच्या खेड, दापोली आणि चिपळूण या तीन तालुक्यांतील उपजिल्हा रुग्णालयांना या नियुक्त्यांमध्ये स्थान मिळालेले नाही. त्यामुळे या भागातील आरोग्यसेवेचा प्रश्न कायम राहणार आहे.
खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे महत्त्व विशेष आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या रुग्णालयात महामार्गावरील अपघातांतील जखमींना तातडीने उपचार देण्याची जबाबदारी आहे. मात्र, आवश्यक वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञांची उपलब्धता नसल्यास रुग्णांना पुढील उपचारांसाठी अन्यत्र हलवावे लागते. त्यामुळे उपचाराला विलंब होण्याची शक्यता निर्माण होते. दापोली उपजिल्हा रुग्णालयातही परिसरातील मोठ्या लोकसंख्येचा भार आहे.
स्थानिक पातळीवरील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेसे डॉक्टर उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. केवळ नियुक्त्या करून न थांबता रुग्णसंख्या, भौगोलिक परिस्थिती, महामार्गावरील अपघातांचे प्रमाण आणि स्थानिक आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेऊन डॉक्टरांचे वाटप होणे अपेक्षित आहे.
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे नोव्हेंबरमध्ये रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आणि नव्या नियुक्त्यांमधील असमतोलाची दखल घ्यावी. खेड, दापोली आणि चिपळूणसह ग्रामीण भागातील रुग्णालयांना आवश्यक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टरांची संख्या
राज्यभरात एमबीबीएस ८१०, स्त्रीरोगतज्ज्ञ १७९, बालरोगतज्ज्ञ १४०, भूलतज्ज्ञ १२२, सर्जन ४७, नमूद नाही असे ८, त्वचारोगतज्ज्ञ १, पॅथॉलॉजी १, रक्त संक्रमण अधिकारी १ अशी स्थिती आहे.