रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील रस्ते, गटार, फुटपाथवर झालेले अतिक्रमणे स्वतःहून हटवण्याबाबतच्या जाहीर नोटीस नंतर रत्नागिरी नगर परिषदेने वैयक्तिक नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. जाहीर नोटीशीची मुदत 17 जानेवारी रोजी संपली असून आता पुढील वैयक्तिक नोटीस 48 तासांची राहणार आहे. कोकण नगर येथून अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे.
रत्नागिरी विमानतळ प्राधिकरणाने कोकणनगर येथील रस्त्याच्या कडेला असणारी अनधिकृत दुकाने, खोके, टपऱ्यांसदर्भात रत्नागिरी नगर परिषदेसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली. ज्या ठिकाणी या अनधिकृत दुकाने आणि टपऱ्या आहेत तेथून विमानतळ, तटरक्षकदलासाठी आवश्यक असणाऱ्या कामांची भुमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम करायचे आहे. परंतु येथे सुमारे 100 अनधिकृत दुकाने, खोके असल्याने हे काम करता आलेले नाही.
कोकण नगर येथील रस्त्याच्या कडेला असलेली अनधिकृत दुकाने, खोक्यांसह शहरातील इतरही अनधिकृत बांधकामे स्वतःहून हवण्याची जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. 17 जानेवारीपर्यंत ही अतिक्रमणे तत्काळ न हटवण्यास ती कोणत्याही क्षणी नगर परिषद काढून टाकेल, असा इशारा देण्यात आला होता.अनधिकृत बांधकामे असणाऱ्यांना देण्यात आलेली मुदत संपली असून कोणाकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता शेवटची वैयक्तिक नोटीस संबंधीत दुकाने, खोक्यांवर चिकटवून पुढील कारवाईची समज दिली जाणार आहे. जलतरण जवळील दुकान गाळ्यांची अनधिकृत बांधकामे याच पद्धतीने जमिनदोस्त करण्यात आली आहेत.