चिपळूण शहर : चिपळूण शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल भोसले यांनी घेतलेला पुढाकार आता शहरातील महिलांच्या सक्रिय सहभागामुळे अधिक प्रभावी ठरत आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘होम मिनिस्टर’ ही महिलांसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 15 जुलैपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आजपर्यंत 178 महिलांनी सहभाग नोंदवला असून, केवळ 12 दिवसांत तब्बल 437 किलो प्लास्टिक संकलित केले आहे. हा उपक्रम 15 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
या स्पर्धेतील संकल्पना अतिशय अभिनव आहे. महिनाभरात किमान 15 दिवस प्लास्टिक संकलन करणार्या महिलांना विशेष कूपन्स देण्यात येत असून, त्यातून लकी ड्रॉद्वारे एक भाग्यवान महिला ‘सोन्याची नथ’ जिंकेल. याशिवाय, 15 ऑगस्टनंतर सेलिब्रिटींच्या उपस्थितीत होणार्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेतून दुसर्या एका विजेत्या महिलेला पैठणी प्रदान केली जाणार आहे. अशा प्रकारे स्वच्छतेच्या कार्यात महिला सहभागी होत असतानाच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा प्रयत्नही या उपक्रमातून होत आहे.
या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अभिनेता ओंकार भोजने यांची ‘स्वच्छतेचे दूत’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे महिलांना या उपक्रमात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकार्यांनी संपूर्ण उपक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि काटेकोरपणे केले आहे. महिलांनी घरातील प्लास्टिक गोळा केल्यानंतर फक्त एक संदेश दिला की, संस्था कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन प्लास्टिक उचलतात, इतका सुटसुटीत आणि प्रभावी हा उपक्रम आहे. या उपक्रमात सहभागी होण्याची संधी अजूनही महिलांसाठी खुली असल्याचे चिपळूण नगर परिषद आणि आयोजक संस्थांच्या वतीने कळवण्यात आले आहे.