खेड : खेड- दापोली राज्य मार्ग क्रमांक 162 वरील फुरूस पुलाचे काम सुरु होणार असून, या पार्श्वभूमीवर 12 ते 22 जून या कालावधीत या मार्गावरील वाहतूक अवजड वाहनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. फुरूस येथे तयार झालेल्या पुलाखालून पाण्याचा प्रवाह वळवण्यासाठी 11 व 12 जून रोजी सर्व वाहतूक बंद ठेवण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली आहे.
पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे खेड-दापोली मार्गावरील अवजड वाहतूक वळवून दस्तुरी-सोंडेघर-पालगड मार्गाने केली जाणार आहे. खेडच्या फुरूस येथील पुलाच्या कामासाठी व अवजड वाहतुकीमुळे होणार्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
खासगी वाहने, माल वाहतूक करणारी वाहने, तसेच अन्य कोणतीही अवजड वाहने खेड-दापोली मार्गावरून नेण्यास बंदी घातली आहे. तसेच 11 व 12 जून रोजी पुलाखालून पाण्याचा प्रवाह पूर्णपणे वळवण्यासाठी संपूर्ण वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक बंद कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा व पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश दिले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार कारवाई करण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे काही काळ नागरिकांची गैरसोय होणार असली तरी फुरूस पुलाचे काम पूर्ण होऊन भविष्यातील प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.