रत्नागिरी : मागील चार दिवसांपासून पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. बुधवारी एकाच दिवशी तब्बल 718 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार असा ‘नॉनस्टॉप’ पाऊस पडत आहे. नद्या, धरणे फुल्ल भरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात 26 जुलैपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. समुद्र खवळला असून उंच उंच लाटा मारत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. जून महिना कोकणासाठी ‘लकी’ ठरला तर जुलै महिन्यात 1 ते 23 जुलैदरम्यान 16 टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे.
एकीकडे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, मराठवाडा येथील काही ठिकाणच्या जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली तर दुसरीकडे कोकणात मात्र पावसाची दमदार बॅटिंग सुरूच आहे. मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. एकाच दिवशी 700 हून अधिक मि.मी. पाऊस पडत आहे. धो-धो पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला असून शेतकर्यांकडून भात लावण्यात येत आहे. जिल्ह्यात 90 टक्क्यांहून अधिक भात पेरणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पेरणी लवकरच पूर्ण होणार आहे. दुसरीकडे सततच्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाली असून सर्वत्र खड्ड्यात पाणीच पाणी साचले आहे. हायवेमार्गावर काम सुरूच असल्यामुळे रस्ते चिखलमय झाली आहेत. वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा, मुंबई-नागपूर हायवेचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यांची अक्षरशा वाट लागली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरित, रत्नागिरी जिल्ह्यात तुफान पाऊस पडत असून आणखी काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असून काही तालुक्यात पूरपरिस्थती निर्माण होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस दमदार बॅटिंग करीत असून जिल्ह्यातील प्रमुख नद्या, धरणे फुल्ल भरली आहेत. जगबुडीत 4.90 मीटर पाणी, वाशिष्ठी 2.42, शास्त्री 4.80 मी, सोनवी 4.20 मी, काजळी 14.50, कोदवली 4.60, मुचकुंदी 1.70, बावनदी 6.75 मीटर इतकी पाणीपातळी आहे. जगबुडी आणि कोदवली या नद्यांनी इशारा पातळी गाठली असून, यामुळे काही गावांत पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.