रत्नागिरी

Ratnagiri rain : रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले!; जनजीवन विस्कळीत

समुद्रालाही उधाण, समुद्रकिनार्‍यावर तीन ते पावणेसहा फुटांच्या लाटा; गावांनाही धोका

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरु झाली आहे. मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसामुळे उन्हाचे चटके बसू लागले होते. परंतु बदललेल्या हवामानामुळे कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत असून वातावरणात गारठा पसरला आहे. समुद्रालाही उधाण आले असून, किनार्‍यावर तीन ते पावणेसहा फुटांच्या लाटा उसळत असल्याने किनार्‍याच्या गावांनाही धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला गुरुवारी पावसाने झोडपून काढले. जोरदार कोसळणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

बुधवारपासून हवामानात बदल होऊन पाऊस सुरु झाला होता. बुधवारी रात्रभर पाऊस पडत होता. गुरुवारीही जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु होती. रत्नागिरी लांजा, राजापूर परिसराला मात्र पावसाने चांगलेच झोडपून काढले. उत्तर रत्नागिरीत मात्र पावसाचा जोर कमी होता. दुर्गम भागात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यात दोन आठवड्यापूर्वीच मासेमारीला सुरुवात झाली होती. मात्र खात्याने दिलेल्या इशार्‍यानंतर मासेमारीला जाण्याचे मच्छीमारांनी टाळले आहे. त्यामुळे शेकडो नौका किनार्‍याला लागल्या आहेत. 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. किनार्‍यावरील भागातही भरतीच्यावेळी तीन ते पावणेसहा फुटाच्या लाटा उसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 19 ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला असून 16 व 17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

14 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालात जिल्ह्यात 296.62 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील अडीच महिन्यात अवघा 2244.35 मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत एक हजार मिमीने पाऊन कमी आहे. गुरुवारी कोसळणार्‍या पावसात कुठेही दुर्घटनेची नोंद झालेली नाही. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी बळीराजा मात्र सुखावला आहे. लावणीची कामे आटोपल्यानंतर समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर मात्र आनंद आहे. जुलै महिन्यात अचानक पावसाने दडी मारल्यामुळे शेतीवर करपा रोग पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र या पावसामुळे भाताची वाढ झपाट्याने होणार आहे. रत्नागिरीतील मिर्‍या, पंधरामाड, मांडवी, भाट्ये किनार्‍यावर लाटांचे तांडव पहायला मिळाले. त्यामुळे किनार्‍यावरील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT