राजापूर : गेले काही दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्याच्या पूर्व परिसरातील करक येथील अर्जुना धरण हे नव्वद टक्के भरले असून असाच पाऊस पडत राहिल्यास पुढील दोन, तीन दिवसांत धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अर्जुनासह कोदवली नदीच्या पाण्याची धोका पातळी ओलांडण्याची शक्यता लक्षात घेऊन अर्जुना नदी काठावरील गावांसह राजापूर शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राजापूर तालुक्याच्या पूर्व परीसरात अर्जुना हा मोठा पाटबंधारे प्रकल्प असून दरवर्षी पावसाळ्यात तो पूर्ण भरतो आणि नंतर सांडव्यावरून त्याचा विसर्ग केला जातो. यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरवात झाली असून जूनमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिले होते. जुलै महिन्यात देखील तेवढ्याच जोमाने पावसाचे प्रमाण राहिले आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला आहे. पडत असलेल्या पावसामुळे पूर्व परीसरातील करक येथील अर्जुना धरण हे जवळपास नव्वद टक्के भरले आहे .पुढील चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी दोन, तीन दिवसांत अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरून जाईल आणि धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरु होईल. परीणामी अर्जुनासह कोदवली या उभय नदयांच्या पाण्याची धोका पातळी ओलांडू शकते त्यामुळे राजापूर शहरासह उभय नदीकाठावरील गावच्या ग्रामस्थांना पाटबंधारे उपविभाग लांजा यांच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अर्जुना नदीच्या काठावर करक,तळवडे,पाचल,रायपाटण, चिखलगांव, गोठणे नीवडे, शिळ,उन्हाळे,कोळवणखडी, सौन्दळ, आडवली, परटवली, बागवेवाडी आदी गावे येतात. सर्व गावच्या ग्रामस्थांना खबरदारी बाबत कल्पना देण्यात यावी अशा सूचना त्या गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांना देण्यात आल्या आहेत. पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उप विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्यावतीने सतर्कबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.