जिल्‍ह्यातील ८७ हजार ८६२ नागरिक तंबाखुमुक्‍त 
रत्नागिरी

Ratnagiri News : जिल्‍ह्यातील ८७ हजार ८६२ नागरिक तंबाखुमुक्‍त

जिल्‍हा रुग्णालयात जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्‍साहात

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त येथील जिल्हा रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या सहकार्याने उत्‍साहात पार पडला. दरम्‍यान, रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 87,862 नागरिकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सोडण्यासाठी समुपदेशन करण्यात आले आहे. या सेवेमुळे अनेक नागरिकांनी तंबाखूमुक्त जीवनाची नव्‍याने सुरुवात केली आहे.

दरम्‍यान, बाह्यरूग्ण विभाग (ओपीडी) येथे उपस्थित नागरिकांना वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम कांबळे यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम, कर्करोगासह विविध असंसर्गजन्य आजारांचा वाढता धोका तसेच तंबाखूमुक्त जीवनशैलीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी निरोगी जीवनासाठी तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात आतापर्यंत 2,845 आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून 71,425 नागरिकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे यांनी जागतिक तंबाखू निषेध दिनाचे महत्त्व स्पष्ट करून तंबाखू व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन केले. यावेळी जिल्हा रुग्णालयामार्फत उपलब्ध असलेल्या मौखिक कर्करोग तपासणी, निदान व उपचार सुविधांबाबत समुपदेशक प्राची भोसले यांनी माहिती दिली. तंबाखू सेवनामुळे उद्भवणाऱ्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे, त्याचे वेळेवर निदान आणि उपचाराचे महत्त्व याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.जिल्हा रुग्णालयामध्ये तंबाखू व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवा, समुपदेशन सुविधा तसेच कर्करोग प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीही यावेळी देण्यात आली.संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आरएमओ डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. यश प्रसादे, एनसीडी समुपदेशक रामेश्वर म्हेत्रे, एनपीसीबी समुपदेशक राम चिंचोळे यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व नातेवाईकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन तंबाखूचे सेवन टाळावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT