अनुज जोशी
Hatlot Ghat Development
खेड : रत्नागिरी आणि सातारा हे जिल्हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील हातलोट घाट रस्त्याच्या रुंदीकरण संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण बैठक ना. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विधीमंडळातील दालनात पार पडली.
या बैठकीत श्री. योगेश कदम यांनी सदर रस्त्याचे काम रखडल्याबाबत गांभीर्य व्यक्त करत, वनविभागाच्या जमिनीचे तातडीने संपादन करून उर्वरित कामास गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सदर रस्ता दळणवळणासाठी लवकरात लवकर खुला करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिल्या. रस्ता पूर्णत्वास गेला तर रत्नागिरी-सातारा जिल्ह्यांमधील संपर्क सुलभ होऊन पर्यटनाला मोठा चालना मिळणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही या कामाला प्राधान्याने हात घालण्याचे आश्वासन देत, लवकरात लवकर उर्वरित काम पूर्ण होईल, असे स्पष्ट केले.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागाचे मंत्रालयीन सचिव, मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच वनविभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सक्रिय पुढाकारामुळे हा रखडलेला प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली.