हर्णै समुद्रकिनारी दोन फिनलेस पॉरपॉईजचा मृत्यू 
रत्नागिरी

Ratnagiri News : हर्णै समुद्रकिनारी दोन फिनलेस पॉरपॉईजचा मृत्यू

एक नर, दुसरे पिल्लू; मृत्यूचे कारण अस्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

दापोली : तालुक्‍यातील हर्णैच्या समुद्रकिनारी गुरुवारी (दि. १७) दोन ‌‘इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज‌’ मृतावस्थेत आढळल्याने समुद्री जीवसृष्टीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यातील एक नर, तर दुसरे लहान पिल्लू असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दोन्ही प्राण्यांचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता आहे; मात्र मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या समुद्री जीवाला स्थानिक लोक गादा मासा या नावाने ओळखतात.

हर्णै कांदळवन विभागाचे प्रमुख फहद जमादार यांना सकाळी हे मृतदेह आढळले. एक मृतदेह हर्णै बंदरातील एम. एम. फिशरीजसमोर, तर दुसरा हर्णै बायपाससमोरील किनाऱ्यावर आढळला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे यांनी एका प्राण्याचे शवविच्छेदन केले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूचे कारण निश्चित करता आले नाही. मोठ्या जहाजाचा धक्का अथवा मासेमारीच्या जाळ्यात अडकणे या शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदनानंतर दोन्ही प्राण्यांना किनाऱ्यावर पुरण्यात आले.

पॉरपॉईज वर्गातील समुद्री सस्तन प्राणी

फिनलेस पॉरपॉईज हा डॉल्फिन नसून पॉरपॉईज वर्गातील समुद्री सस्तन प्राणी आहे. पाठीवर ठळक पृष्ठीय पर नसणे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. हा प्राणी प्रामुख्याने किनाऱ्यालगतच्या पाण्यात आढळतो. लहान मासे, कोळंबी व अन्य जलचर हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर त्याच्या नोंदी आढळतात. हर्णैसारख्या सागरी जैवविविधतेने समृद्र किनाऱ्यावर एकाच दिवशी दोन फिनलेस पॉरपॉईजचा मृत्यू झाल्याने मासेमारीची जाळी, जहाजांची वाहतूक आणि मानवी हस्तक्षेप याबाबत अधिक दक्षतेची गरज अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT