रत्नागिरी : रत्नागिरीत गुरुवारी दुपारनंतर काही तालुक्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार झाले होते. लांजा, राजापूर, संगमेश्वर व चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस कोसळला. या अवकाळी पावसाचा फटका आंबा व काजू या फळ पिकांना बसणार आहे. मुळात यंदा या दोन्ही पिकांना बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. त्यामुळे दोन्ही पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे.
गुरुवारी दुपारी उन्हाचे तीव्र चटके जाणवत होते. लांजा तालुक्यात दुपारी 2.30 वाजता पूर्व भागातील कोचरी, सालपे, माचाळ, खेरवसे, कोर्ले, वाडगाव, गोविळ, पालू यांसह पूर्व भागाला पावसाने जोरदार झोडपले. वारा, ढगांचा गडगडाट व विजांसह जोरदार पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात पावसाळासदृश वातावरण तयार झाले असून सह्याद्रीच्या पट्ट्यातील तालुक्यांमध्ये गारांसह पाऊस पडला.
राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.