गुहागर : गुहागर शहरातील वरचापाट परिसरातील समुद्रकिनार्यावर भरदुपारी दोन कुटुंबांतील 4 जण पाण्यात उतरले होते. त्यापैकी 42 वर्षीय अमूल मुथ्था यांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दोन मुले आणि एका महिलेला गुहागर नगरपंचायतीचे जीवरक्षक आणि श्री समर्थ वॉटर स्पोर्टस्च्या दोन कर्मचार्यांना वाचविण्यात यश आले आहे. ही घटना दि. 27 डिसेंबरला दुपारी 11.45 ते 12.15 च्या दरम्यान घडली.
सध्या नाताळची सुट्टी असल्याने गुहागरमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी आहे. यापैकी अनेक पर्यटकांसाठी गुहागरचा समुद्र हा आकर्षणाचा मुख्य बिंदू ठरला आहे. या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.?मुंबई पवई-चांदेराई येथे राहणारे कांचन विजयकुमार मुथ्था, अमूल विजयकुमार मुथ्था, सौ. श्वेता अमुल मुथ्था आणि विहान अमुल मुथ्था हे कुटुंब 24 डिसेंबरला सायंकाळी गुहागरमध्ये दाखल झाले. अमूल मुथ्था व श्वेता मुथ्था सॉफ्टवेअर इंजिनिअर असून दोघेही मुंबई-पवई येथे नोकरी करतात. नाताळची आठ दिवसांची सुट्टी निसर्गाच्या सानिध्यात घालविण्यासाठी त्यांनी गुहागरजवळ जोशी होम स्टेमध्ये मुक्काम केला होता.
सौ. श्वेता मुथ्था यांची पिंपळे सौदागर, पुणे येथे रहाणारी बहिण सौ. सोनल सिंघवी ही पती पंकज सिंघवी आणि मुलगी सिया सिंघवी यांच्यासह 26 डिसेंबरला गुहागरला आली. सिंघवी कुटुंब शहरातील राजगड हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. 26 डिसेंबरला रात्री सिंघवी व मुथ्था कुटुंब एकत्र आले त्यावेळी त्यांनी 27 डिसेंबरला दुपारी समुद्रावर पोहायला जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मुथ्था कुटुंब आणि सिंघवी कुटुंब 27 डिसेंबरला दुपारी 11.45 च्या दरम्यान हॉटेल राजगडच्या मागे असलेल्या समुद्रकिनार्यावर गेले. पंकज सिंघवी आणि सोनल सिंघवी समुद्रकिनार्यावर वाळुत थांबले होते. तर अमुल मुथ्था (वय 42), श्वेता मुथ्था (वय 42), विहान मुथ्था (वय 13) आणि सिया सिंघवी (वय 19) हे चौघे समुद्रात पोहायला गेले. पाण्यात खेळता खेळता अमूल मुथ्था खोल पाण्यात गेले. त्यांनी पुन्हा किनारा गाठण्यासाठी पोहायला सुरवात केली. मात्र त्यांची दमछाक झाली. अन्य तिघे देखील अमुल मुथ्था यांच्यापासून थोड्या अंतरावर होते. सिया सिंघवीने मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरवात केली.
याच काळात पवारसाखरी येथील अक्षय पवार सहज फिरायला समुद्रावर आले होते. त्यांनी पर्यटकांची ओरड ऐकली आणि सोहम सातार्डेकरला फोन करुन मदतीसाठी बोलावले. सोहमने नगरपंचायतीचा कर्मचारी आशिष सांगळे याला फोन केला. आशिष आणि सोहम समुद्रावर येत असतानाच त्यांनी जीवरक्षक प्रदेश तांडेल आणि श्री समर्थ वॉटर स्पोटर्सचे मालक उमेश भोसले यांना बोलाविले. याच काळात पोलिसांपर्यंतही बातमी पोचली. प्रदेश तांडेल आणि श्री समर्थ वॉटर स्पोर्टस्मधील कर्मचारी मुजाहुद्दीन मिरकर व सद्दाम बागकर असे तिघेजण जेट स्की घेवून समुद्रातून हॉटेल राजगडच्या मागे आले. त्यांनी बेशुध्दावस्थेत असलेल्या अमुल मुथ्था यांच्यासह श्वेता मुथ्था, विहान मुथ्था आणि सिया मुथ्था यांना समुद्रकिनार्यावर आणले. जीवरक्षक प्रदेश तांडेल आणि आशिष सांगळे यांनी अमुल मुथ्थांना सीपीआरची ट्रीटमेंट दिली. तोपर्यत गुहागरचे पोलिसही तेथे पोचले होते. बेशुद्ध अवस्थेतील अमुल मुथ्था यांना तत्काळ वाहनाने ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे नेण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकार्यांनी अमुल मुथ्था यांना मृत घोषित केले तर अन्य तिघाजणांना वाचविण्यात यश आले आहे.
पर्यटकांनी सूचनांचे पालन करावे!
पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणच्या किनार्यावर येतात आणि त्यांना समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरत नाही. यावेळी पर्यटकांनी विशेष काळजी घ्यावी. किनार्यावर लावलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. गुडघाभर पाण्यापेक्षा अधिक खोल पाण्यात पर्यटकांनी जाऊ नये, लहान मुले आणि तरुणांच्या उत्साहाला आवर घालावा, पोलिस व जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करावे.
अपघात टाळण्यासाठी गुहागर न. पं. पावले उचलणार ः मुख्याधिकारी
आजची घटना दुर्दैवी आहे. पुन्हा असे होऊ नये, या द़ृष्टीने नगरपंचायत ठोस पावले उचलेल. गुहागर इथे एकच जीवरक्षक आहे आणि 6 कि.मी.चा किनारा सांभाळणे एकास शक्य नाही. तसेच गुहागर नगरपंचायतीला सध्याच्या उत्पन्नात 6 जीवरक्षक नियुक्त करणे शक्य नाही. त्यामुळे? ? गुहागरसाठी 6 जीवरक्षक मिळावे, ही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे. भविष्यात जास्त जीवरक्षक सुसज्ज व्यवस्थेसह गुहागर किनारपट्टीवर असतील, असे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी सांगितले.