देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आणि देवरुख पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घाटीवळे करंजारी गावात रविवारी एकाच रात्री ५ बंद घरे फोडून चोरांनी पोबारा केला. या प्रकाराने व चोरांच्या सुळसुळाटाने घाटीवळे करंजारी गावात घबराट पसरली आहे. घाटीवळे गावातील अब्दुल रहमान फोडकर, इकबाल उमर फोडकर , अब्दुल मज्जिद शिरगावकर (घाटिवळे मुसलमान वाडी) येथील या तिघांची बंद घरे चोरट्यांनी लक्ष्य केली आणि कुलुपे तोडून यातील काही ऐवज लंपास केला.
घाटीवळे गावातील चोऱ्या केल्यानंतर चोरांनी सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील करंजारी गावातील चंद्रकांत शिवराम भुर्के, बाबा वळंजू या दोन्ही घरांना चोरट्याने लक्ष्य केले. महत्त्वाचे म्हणजे ही दोन्ही घरे एकदम हायवे टच असून भुर्के यांचे घर बंदच होते; परंतु बाबा वळंजू हे काही कामानिमित्त बाहेर गेलेले असताना चोरांनी डल्ला मारला. या दोन्ही घरातून सुमारे ५२ हजाराचा ऐवज लंपास असल्याचे समजते. विशेष म्हणजे बाबा वळंजु यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. मात्र आपले काम साधून पुन्हा याच कडी कोयंड्याला दुसरे कुलूप लावून पोबारा केला.