रत्नागिरी ः रत्नागिरीतील मरण आधीच महाग असताना ते पुढे न परवडणारे होणार आहे. चर्मालय येथील गॅस शवदाहिनीचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या या शवदाहिनीतील अंत्यसंस्कारासाठी शहर हद्दीसाठी 500 रुपये तर हद्दीबाहेरील अंत्यसंस्कासाठी 1000 हजार रुपये घेतले जात आहेत. आता हे दर वाढविण्याचा नगरपरिषदेचा विचार आहे.
प्रत्यक्षात रत्नागिरी नगर परिषदेला एका अंत्यसंस्कासाठी सुमारे 3 हजारांपेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे. तत्पूर्वी मृत्यू झाल्याचा दाखला देण्यासाठी घरी येणार्या डॉक्टरना फी द्यावी लागते. तर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी शहर हद्दीसाठी 1 हजार रुपये आणि हद्दीबाहेरील प्रेताच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडे मिळवण्यासाठी 2 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
रत्नागिरीत नगर परिषदेत गेल्या 5 वर्षांपासून निवडणूका न झाल्याने नगरसेवक नसून प्रशासक आहे. नगरसेवकांच्या कारकिर्दीत हे नगरसेवक त्यांच्या प्रभागात मृत्यू झाल्यानंतर मृत्यू झाल्याचा दाखला देत होते. हा दाखलाच स्मशानभूमीत लाकडे मिळण्यासाठी पास म्हणून वापरला जात होता. परंतु आता स्मशानभूमीत मृतदेहावर अग्निसंस्कार होण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेचा पास मिळवण्यासाठी डॉक्टरकडून मृत्यूचा दाखला आणणे बंधनकारक झाले आहे. डॉक्टरांनी दिलेला मृत्यूचा दाखला दाखवल्यानंतर रत्नागिरीतील दोन स्मशानभूमींमध्ये आणि गॅस शवदाहिनीत अग्निसंस्कार करण्याची परवानगी मिळते.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या या स्मशानभूमींमध्ये गेल्या सात महिन्यांत 321 मृतदेहांवर अग्निसंस्कार झाले आहेत. म्हणजे महिन्याला सुमारे 45 मृतदेहांवर अग्निसंस्कार होत आहेत. या शवदाहिनीतील एका अग्निसंस्कारासाठी रत्नागिरी नगरपरिषदेला सुमारे 3 हजार रुपये खर्च येतो. याठिकाणी असलेल्या कर्मचार्यावर होणारा खर्च यामध्ये समाविष्ट नाही.यामुळे शवदाहिनीतील अंत्यसंस्काराचे दर वाढवण्याबाबत रत्नागिरी नगर परिषदेने विचार सुरु केला आहे. अग्निसंस्काराचा खर्च वगळता मृत्यूदाखला देण्यासाठी घरी भेट देवून मृत्यूची खात्री करणार्या काही डॉक्टरांची फी मोठी आहे. 500 रुपयांपासून?2 हजार रुपयांपर्यंत फी आकारली जात आहे. मृत्यू झाला आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये मृतदेह नेल्यानंतर त्या मृतदेहाचे पोस्टमार्टम किंवा शवविच्छेदान केले जाते. हे शवविच्छेदन मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना अपेक्षीत नसते. परंतू शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्यानंतर तेथे शवविच्छेदन केलेच जाते. त्यामुळे मृत्यू दाखला देणार्या काही डॉक्टरांना ही एक संधीच निर्माण झाली आहे.