रत्नागिरी : ‘निरोप घेता आता तुम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी....’ असे गाऱ्हाणे घालत बाराव्या दिवशी शुक्रवारी अत्यंत भक्तिभावाने व गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यातील गणेशभक्त निरोप देणार आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात भक्तगणांकडून सार्वजनिक ७२ आणि घरगुती ३६ हजार १७५ अशा एकूण ३६ हजार २४७ गणरायांना निरोप देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विसर्जनाच्या ठिकाणी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनेक विसर्जन घाटही बाप्पाच्या विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत.
गणेश चतुर्थीला १४ सप्टेंबर रोजी वाजत-गाजत अगदी पारंपरिक पध्दतीने जिल्ह्यात सर्वत्र सार्वजनिक १२६ आणि १ लाख ६९ हजार ५३८ खाजगी अशा एकूण १ लाख ६९ हजार ६६४ गणरायांचे आगनम झाले होते. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी घरोघरी गौराईचेही आगमन झाले. १८ सप्टेंबर रोजी गौरीपूजन करण्यात आले. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आल्यानंतर आता २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणरायांचे विसर्जन करण्यात येणार आहे.
पोलिस विभागाकडून वाहतुकीचे नियोजन
रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी सायंकाळी गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी होणार आहे. शहरासह साळवी स्टॉप, मारुती मंदिर, माळनाका, परटवणे आदी भागांमधील गणेशभक्त विसर्जनासाठी मांडवी समुद्रकिनारी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी मांडवी समुद्रकिनाऱ्यासह भाट्ये समुद्रकिनारीदेखील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलिस विभागाकडून वाहतुकीची कोंडी होउ नये, यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीसह मंडणगड, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूरमध्येही धुमधडाक्यात गणरायांना निरोप देण्यात येणार आहे.
भगवान विष्णूचे पूजन आणि अनंत व्रत
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि शेषनागाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. असे मानले जाते की, महाभारतात विजनवासात असताना श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला त्याचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी पूजा करण्याचा सल्ला दिला होता. पूजेमध्ये रेशमी किंवा सूती धाग्याला १४ गाठी मारुन ‘अनंतसूत्र’ तयार केले जाते. हे सूत्र विष्णूच्या मंत्रांनी पवित्र करुन पुरुषांच्या उजव्या आणि महिलांच्या डाव्या हातावर बांधले जाते. हे सूत्र सूख, समृध्द आणि सर्व संकटांपासून रक्षक करण्याचे प्रतीक मानले जाते.
सुरक्षेची कडेकोट तयारी
सार्वजनिक विसर्जनांच्या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक प्रशासन, नगर परिषद आणि पोलिस दलातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी जीवरक्षक, वैद्यकीय सेवा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असून पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे.