रत्नागिरी : उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे कोकणात पर्यटकांची गर्दी मोठ्या संख्येने वाढत आहे तसेच चाकरमानी आपआपल्या मुळगावी परतले आहेत. त्यामुळे वाढत्या चारचाकी, रिक्षा या वाहनांमुळे त्याचा ताण सीएनजी पंपावर पडत आहे. पंपावर चारचाकीसह रिक्षांच्या लांबचलांब रांगा लागू लागल्या आहेत. तुडवड्याच्या अफवेने पंपावर रणरणत्या भर उन्हातही सीएनजीसह पेट्रोल पंपावर रांगा लावून वाहनचालक हैराण झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून पंपावर ही वाहनांची गर्दी वाढली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूरमधील सीएनजी पंपावर सिंधुदुर्ग व रत्नागिरीत येणारे चाकरमानी, गोव्याला जाणारे पर्यटक यांच्या चारचाकी वाहनांच्या रांगा लागत आहेत. अनेक वाहनचालक सीएनजी संपला तरीही सीएनजीच्या रिफिलींग गाड्या येईपर्यंत उभे राहत आहेत. चिपळूण, खेड, रत्नागिरी, दापोली शहरात तर स्थानिक रिक्षाचालकांनाही याचा फटका बसत आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे रिक्षा व्यावसायिकांना सीएनजीसाठी जास्तीतजास्त वेळ रांगेतच घालवावा लागत आहे.
पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात संगमेश्वर डिंगणी येथेच ऑनलाईन पंप असल्याने, त्याच ठिकाणी रिफिलींग गाड्याही भरल्या जात असल्याने जिल्ह्यातील सर्वच सीएनजी पंपावरील गाड्यांना एकाच रिफिलींग पंपात जावे लागत आहेत. पंपावरील सीएनजी लवकर संपत असल्याने या गाड्यांच्या फेऱ्याही वाढल्या आहेत.
मिरजोळे सीएनजी पंपावर कामगारांना मारहाण, पंप बंद
सीएनजीपंपावर गर्दी होत असल्यामुळे किरकोळ कारणांवरून मिरजोळे सीएनजी पंपावरील कामगारांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. काहीजण विनाकारण अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, दमदाटी, मारहाण झाल्यामुळे पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. नवीन कर्मचारी नियुक्ती, सुरक्षेचे नियोजन करून पंप सुरू करू, असे निवेदन मिरजोळे पंपचालकांनी जिल्हा पुरवठा विभागास दिले आहे.