Ratnagiri News | जिल्ह्यातील 9 हजार जण झाले साक्षर File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News | जिल्ह्यातील 9 हजार जण झाले साक्षर

जिल्ह्याचा निकाल हा 99.44 टक्के

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमात मागील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कोल्हापूर शैक्षणिक विभागाने असाक्षर नोंदणी आणि साक्षरता परीक्षेत लक्षवेधी कामगिरी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल हा 99.44 टक्के लागला आहे. जिल्ह्यातील 9 हजार 800 जण या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

देश पातळीवर राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेने (एनआयओएस) 23 मार्च 2025 रोजी घेतलेल्या उल्लास परीक्षेचा महाराष्ट्र राज्याचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. या परीक्षेत राज्याचा निकाल 98.75 टक्के लागला आहे. यात कोल्हापूर विभागाचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 99.44 टक्के लागला आहे. कोल्हापूर शैक्षणिक विभागात कोल्हापूरसह सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षा, पाचवी आठवी शिष्यवृत्ती, एनएमएमएस शिष्यवृत्ती, राष्ट्रीय संपादनूक सर्व्हे, आधार नोंदणी व पडताळणी, अपार नोंदणी, पीजीआय यासह शिक्षण विभागातील बहुतांश मापदंडात कोल्हापूर विभाग राज्यात पुढे आहे.

मागील दोन वर्षात कोल्हापूर विभाग उल्लास अभियानामध्ये पिछाडीवर होता. राज्य योजना कार्यालयाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि जिल्हा व तालुका स्तरावरील समित्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे विभागाने ‘उल्लास’ मधील असाक्षर नोंदणीचे, परीक्षेस बसवण्याचे राज्यस्तरावरून देण्यात आलेले उद्दिष्ट (लक्ष्य) ओलांडले आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (योजना) यांची तर तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची भूमिका सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मागीवर्षी कोल्हापूर विभागास 68,872 नोंदणीचे उद्दिष्ट होते. मागील वर्षी नोंदणी झालेले परंतु परीक्षेस बसू न शकलेले तसेच सुधारणा आवश्यक शेरा प्राप्त असलेले आणि चालू वर्षी देण्यात आलेले नोंदणीचे उद्दिष्ट असे मिळून 74,827 असाक्षरांना परीक्षेस बसवण्याचे उद्दिष्ट होते. विभागात प्रत्यक्ष नोंदणी 84,218 इतकी झाली. तर परीक्षेस 83,529 बसले. त्यापैकी 83,224 उत्तीर्ण झाले. केवळ 305 असाक्षरांना सुधारणा आवश्यक शेरा मिळाला आहे. जिल्हानिहाय विचार करता विभागात रत्नागिरी वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांनी लक्ष्यभेदी कामगिरी केली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला विशेष प्रयत्न करावे लागणार असल्याचे सध्यातरी चित्र दिसून येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यास 9,337 नोंदणीचे व 12,094 परीक्षेस बसवण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात नोंदणी 7,982 इतकीच झाली. तर परीक्षेस 9,855 इतके बसले. त्यापैकी 9,800 इतके उत्तीर्ण झाले. केवळ 55 असाक्षरांना सुधारणा आवश्यक असा शेरा प्राप्त झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी वैदेही रानडे, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी अभिनंदन केले आहे.

उल्लास योजनेने आता सर्वत्र गती घेतली आहे. अद्यापही मोठा पल्ला गाठायचा आहे. नवसाक्षरांचे निरंतर शिक्षण सुरू राहण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
-राजेश क्षीरसागर, विभागीय समन्वयक उल्लास, तथा विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण मंडळ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT