एनएमएमएस प्रश्नपत्रिका संच सर्व शाळांना मोफत देणार Pudhari File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : एनएमएमएस प्रश्नपत्रिका संच सर्व शाळांना मोफत देणार

जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचा निर्धार; मंगळवारी रत्नागिरीत प्रकाशन

पुढारी वृत्तसेवा

रामपूर : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या व जिल्ह्यातील एन. एम. एम. एस. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना व शाळांना उपयुक्त ठरणाऱ्या एम.एम.एम.एस. प्रश्नपत्रिका संचाचे प्रकाशन ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलमध्‍ये करण्यात येणार आहे. हा प्रश्नपत्रिका संच जिल्ह्यातील शाळांना मोफत देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एन. एम. एम. एस. परीक्षेला राज्यातील इयत्ता ८ वी चे कमी उत्पन्न असलेले विद्यार्थी पात्र असतात. या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने दरवर्षी १२ हजार प्रमाणे ४ वर्षे एकूण ४८ हजार शिष्यवृत्ती दिली जाते. या परीक्षेतील जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मुख्याध्यापक संघाने या परीक्षेतील प्रत्येक शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करून तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारकांचा टक्का वाढून गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून लाभ व्हावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम हाती घेतला आहे.

याबाबत मंगळवारी रत्नागिरी येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा व प्रश्नपत्रिका संच प्रकाशन कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, शिक्षण व वित्त सभापती नंदकुमार मुरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अय्युब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, राज्य महामंडळ कोषाध्यक्ष संदेश राऊत, रमेश तरवडेकर यांच्यासह संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सर्व तालुका अध्यक्ष, सचिव व जिल्ह्यातून निवडलेले तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर यांनी कळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT