Online Fraud Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Fraud : सॉफ्टवेअर अपडेटच्या मेसेजवर क्लिक करताच मोबाईल हॅक; २.३४ लाखांची फसवणूक

गिम्हवणेतील नोकरदाराला सायबर चोरट्यांचा गंडा; खात्यात उरले फक्त ९०६ रुपये

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : मोबाईल सॉफ्टवेअर अपडेटच्या मेसेजवर क्लिक करणे दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील एका नोकरदाराला महागात पडले. मोबाईल हॅक करून अज्ञात सायबर चोरट्याने त्यांच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून तब्बल २ लाख ३४ हजार १ रुपये परस्पर ट्रान्सफर करूत फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलेश सूर्यकांत झगडे (वय ४२, रा. गिम्हवणे तेलीवाडी, ता. दापोली) हे नोकरदार असून, ९ जुलै २०२६ रोजी त्यांच्या मोबाईलवर सॉफ्टवेअर अपडेट करण्याचा मेसेज आला होता. मोबाईल अपडेट करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्या मेसेजवर क्लिक केले. त्यानंतर मोबाईल हॅक झाल्याचे निदर्शनास आले. मोबाईल गरम होणे, बॅटरी वेगाने संपणे, तसेच गुगल पे बंद पडणे असे प्रकार सुरू झाले.

१६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मोबाईलमधील गुगल पे ॲप आपोआप सुरू झाल्यानंतर झगडे यांनी बँक खात्यातील शिल्लक तपासली. त्यावेळी खात्यात केवळ ९०६ रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. खात्यातून पैसे काढल्याचा संशय आल्याने त्यांनी युनियन बँक ऑफ इंडियाकडून खाते विवरणपत्र घेतले. त्यातून १० ते १२ जुलै या कालावधीत वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन आयडीद्वारे त्यांच्या खात्यातून एकूण २ लाख ३४ हजार १ रुपये परस्पर हस्तांतरित झाल्याचे स्पष्ट झाले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर झगडे यांनी २७ नोव्हेंबर रोजी दापोली पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ३१८(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT