konkan railway 
रत्नागिरी

Ratnagiri News : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी रेल्वेच्या आणखी चार विशेष गाड्या

चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार

पुढारी वृत्तसेवा

खेड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान आणखी चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरात नियमित सेवांव्यतिरिक्त एकूण ३९० गणपती विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत.

यामध्ये मध्य रेल्वेच्या २६२, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेने ८ सप्टेंबरपासून मुंबई-सावंतवाडी रोड दरम्यान दैनंदिन एक्सप्रेस सेवाही सुरू केली आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन आता आणखी चार विशेष सेवा जाहीर करण्यात आल्या आहेत.

सीएसएमटी-सावंतवाडी रोड विशेष गाडी क्रमांक ०१००९ ही २६ सप्टेंबर रोजी दुपारी १.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०१० ही २० व २७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.०५ वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.

या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाडीला दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय आसनांसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी डब्यांची रचना आहे.

गाडी क्रमांक ०१००९ चे आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनारक्षित डब्यांसाठी यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट काढता येणार असून प्रवाशांना रेलवन ॲपचाही वापर करता येणार आहे. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या वेळांची सविस्तर माहिती रेल्वेच्या अधिकृत चौकशी प्रणाली तसेच एनटीईएस ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT