File Photo 
रत्नागिरी

रत्नागिरी : मार्लेश्वर तिठा येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक; देवरूख पोलीसांची कारवाई

backup backup

साडवली; पुढारी वृत्तसेवा : गांजाची कारमधून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या चौघांवर देवरूख पोलीसांनी कारवाई करत त्यांना सोमवारी (दि. १३) अटक करण्यात आली. ही कारवाई देवरूख-साखरपा मार्गावरील मार्लेश्वर तिठा येथे सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने देवरूखसह संंगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कारवाईत एकूण १ लाख ५४ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीचा सण असल्याने देवरूख पोलीसांकडून नाक्या नाक्यावर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यानुसार मार्लेश्वर तिठा येथे सोमवारी (दि. १३) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू आहे. यावेळी एका कारची तपासणी करण्यात आली. पोलीसांनी चालकाकडे गाडीची कागदपत्रे मागितली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पोलीसांना संशय आल्याने त्यांनी संपूर्ण गाडीची झडती घेतली. दरम्यान गाडीत चौघेजण होते, तसेच तब्बल १ किलो ९०० ग्रँम वजनाचा गांजा मिळून आला. पोलीसांनी गांजासहीत इक्बाल हनिफ खान (वय-२७, रा. देवरूख कांजिवरा), अजित उर्फ आऊ अनंत चव्हाण (वय-५४, देवरूख मच्छीमार्केट), संदीप गंगाराम भायजे (वय-४५, रा. देवरूख भायजेवाडी) व संदेश चंद्रकांत पाल्ये (वय-२७, रा. देवरूख कांगणेवाडी) या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम ८ (क), २० (ब) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

सदरची कारवाई देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार डी. एस. पवार, हे. काँ. संजय मारळकर, हे. काँ. सागर मुरूडकर, पो. काँ. प्रशांत नागवेकर, चालक प्रविण ओहोळ यांनी केली. दरम्यान, या चौघांना मंगळवारी देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायाधिशांनी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT