चिपळूण : मार्गताम्हाणे खुर्द पैकी सुतारवाडी येथील आंबा-काजू बागेतील विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची वन विभागाच्या बचाव पथकाने सुरक्षित सुटका केली. हरणाची वैद्यकीय व शारीरिक तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
सुतारवाडी येथील प्रताप सुर्वे यांच्या मालकीच्या आंबा-काजू बागेतील विहिरीत वन्यप्राणी पडल्याची माहिती त्यांनी वनपाल एस. एस. सावंत यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पाहणी केली असता हा प्राणी ससा नसून दुर्मिळ पिसोरी हरीण (माऊस डिअर) असल्याचे स्पष्ट झाले.
विहिरीतील पाण्यात पोहत असलेल्या हरणाला जाळ्याच्या रक्षित पकडण्यात आले. त्यानंतर पिंजऱ्यात ठेवून त्याची वैद्यकीय व शारीरिक तपासणी करण्यात आली. हरीण सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या मोहिमेत वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, वनरक्षक कृष्णा इरमले आणि आरआरटी पथकाचे सदस्य अथर्व घाग यांनी सहभाग घेतला.