रत्नागिरी : तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारा पर्यटनदृष्ट्या प्रसिध्द असल्याने गेल्या काही वर्षात पर्यटकांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी स्थानिकांनाही रोजीरोटीची संधी निर्माण झाली होती. मात्र ऐन पर्यटन हंगाम सुरु होण्या आधीच याठिकाणी ग्रामस्थांनी उभारलेल्या तात्पुरत्या स्टॉलवर वनविभागाने अचानक बुलडोजर चालवून त्यांची रोजीरोटीच बंद पाडण्याचे काम केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
रत्नागिरी-गणपतीपुळे सागरी मार्गावर आरे-वारे पुलानजीक असलेल्या बीचवर गेल्या काही वर्षात पर्यटकांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. या पर्यटकांच्या सोयीसाठी या भागातील काही ग्रामस्थांनी चहा-वडापाव स्टॉल, नारळपाणी, कोकणी पध्दतीचा नाष्टा, समुद्रात भिजून येणाऱ्या पर्यटकांसाठी आंघोळीची व्यवस्थाही केली होती. याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा जवळपास २० ते २१ स्टॉल उभारण्यात आले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाळूचा भाग असल्याने, या स्टॉलला मजबुती मिळावी यासाठी काहींनी चिरे, मातीचा भराव टाकून ओटेही बांधले होते.
सध्या सुरुबनामध्ये वनविभागाचा ट्री हाऊस प्रोजेक्टचे काम सुरु आहे. यातच काही लोकांनी आपापसातील वादातून वनविभागाकडे तक्रार केल्याचे वनविभागातील अधिकाऱ्यांकडून या स्टॉलवाल्यांना सांगण्यात आले. मात्र निनावी तक्रारीची दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या स्टॉलधारकांना कोणतीच कल्पना न देता अचानक या स्टॉलवर जेसीबी व बुलडोझरच्या सहाय्याने मोठ्या फौजफाट्यासह कारवाईला सुरुवात केली. दोन दिवस ही कारवाई सुरु होती. काही छोट्या स्टॉलधारकांना साहित्यही गोळा करण्याची संधी मिळाली नाही. यात हजारो रुपयांचे नुकसान या स्टॉल धारकांचे झाले आहे. स्टॉलधारकांनी उभारलेले कठडेही उध्वस्त करण्यात आले. यात काही गरीब महिला असून, काही विधवा महिला आपल्या कुटुंबाचे चरितार्थ चालवत आहेत. काही तरुणांनीही याठिकाणी व्यवसाय सुरु केले आहेत.
आरे-वारे येथे दुर्घटना घडल्यास हेच स्टॉलधारक मदतीला धाव घेत असत. मात्र त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम वनविभागाच्यावतीने करण्यात आल्याच्या भावना ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात आल्या. यामध्ये वैभव वाडकर, शामल पारकर, अर्चना मयेकर, दीपाली मयेकर, नवज्योत मयेकर, संदीप मयेकर, वैभव मयेकर, रवी शिवलकर, रवी पारकर, उल्का बनप, विलास चौगुले, शितल शिवलकर, आशिष कनगुटकर, अजय बिर्जे, रणजीतसिंग मालगुंडकर, अमोल घाग, वैभव प्रकाश मयेकर, नरेश मयेकर, संगिता मयेकर, साहील मयेकर, प्रिती मयेकर या स्टॉलधारकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. स्टॉलधारक व त्यांच्या कुटुंबियांमध्ये वनविभागाच्या कारवाईबाबत तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
आरे-वारे समुद्रकिनारी वनविभागाच्या हद्दीत असलेल्या या झोपड्यांचे स्ट्रक्चर, ओटे दगडी बांधकामाने परमनंट केले जात असल्याची खबर मिळाली होती. त्यामुळे या सर्व झोपड्या काढून टाकण्यात आल्या.- विक्रम गुरव वनक्षेत्रपाल रत्नागिरी
गेले काही वर्ष या ठिकाणी आमचे व्यवसाय सुरु आहेत. वनविभागाने कोणतीही पूर्व कल्पना न देता, अचानक ही कारवाई सुरु केली. यात अनेक गरीब महिलांना मोठ्या नुकसानीलाही सामोरे जावे लागले. वन अधिकाऱ्यांकडून तक्रार किंवा कारवाईबाबत योग्य माहिती दिली जात नव्हती. ऐन पर्यटन हंगामाच्या सुरुवातीला ही कारवाई करण्यात आल्याने, आता आम्ही व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.वैभव वाडकर, स्टॉलधारक, आरेवारे बीच