रत्नागिरी : अवघ्या दोन दिवसांवर श्रावणासोबत विविध सण येऊन ठेपला आहे, तर पुढील महिन्यात लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. या काळात उपवास आणि सणांच्या निमित्ताने गोड खाद्यपदार्थाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. विविध प्रकारची मिठाईमध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या मागणीसोबतच अन्न सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. काही मिठाई विक्रेते, हॉटेल्स चालकांकडून अन्न सुरक्षा मानकांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने विषबाधा आणि अन्य संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणाच्या पूर्वीच मिठाई दुकान, खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह अन्नपदार्थाची तपासणी होणे गरजेचे आहे.
हिंदू धर्माचा पवित्र असा श्रावण महिना 25 जुलैपासून सुरूवात होतोय त्याचबरोबर इतर सण याच महिन्यात आहेत. पुढील महिन्यात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. गौरी-गणपतीच्या काळात गणेशभक्तांकडून अनेक पद्धतीची मिठाई केली जाते. सणासुदीत ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई मिळावी म्हणून अन्न व औषध विभागाच्या वतीने करडी नजर असते. दरम्यान, आता जिल्ह्याला स्वतंत्र अन्न व औषध अधिकारी नसल्यामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे विनापरवाना चायनीजच्या गाड्यावर भेसळ सुरू आहे तसेच अनेक हॉटेलमध्ये अन्न व औषध विभागाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. अन्नाची तपासणी आवश्यक आहे. श्रावणाबरोबरच राखी पौर्णिमा, गोकुळाष्टम यासह गौरी-गणपती सण आहेत. या सणात पेढा, बर्फी, मोदक, लाडू, मोतीचूर लाडू, काजूकतली यासह विविध प्रकारची मिठाई खरेदी करीत असतात. त्याचबरोबर उपवासाचे पदार्थापैकी चांगल्या दर्जाची भगर मिळावी यासाठी दुकानदारांना सूचना देणे गरजेचे आहे.
हिंदू धर्माचा पवित्र महिना श्रावण, गौरी-गणपतीचे आगमन होणार आहे. या सणात मिठाईसह विविध पदार्थांना महत्त्व असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, उपवासाचे पदार्थाची तपासणी करणे गरजेची आहे. जेणेकरून ताजे, चांगल्या दर्जाचे अन्न नागरिकांना मिळावे.राहुल पवार, नागरिक