मच्छीमारांचा सहायक आयुक्तांना घेराव 
रत्नागिरी

Ratnagiri News : मच्छीमारांचा सहायक आयुक्तांना घेराव

वेंगुर्ले समुद्रात गस्ती नौकेच्या धडकेने मिरकरवाड्यातील मच्छीमार नौकेचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः रत्नागिरीतील बंदर परवाना असलेली मच्छीमार नौका सिंधुदुर्गातील वेंगुर्ला समुद्रातून मच्छीमारी करत असताना पाठलाग करून सिंधुदुर्ग सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने मागून धडक दिली. या धडकेने रत्नागिरीतील नौकेच्या मागे असलेली डिगी (छोटी होडी) उलटली. या डिगीतील खलाशी समुद्रात पडून जखमी झाले. याचा जाब सिंधुदुर्ग सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त यांना रत्नागिरीतील मच्छीमारांनी मत्स्य व्यवसाय कार्यालयात जाऊन जाब विचारला. सिंधुदुर्ग सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचाही चार्ज असल्याने ते रत्नागिरीतील कार्यालयात आलेले होते.

रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात मासळी मिळत नसल्याने मिरकरवाड्यातील समद मजगावकर यांची मासेमारी नौका सिंधुदुर्गातील समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेली होती. वेंगुर्ला समुद्रात रात्री 10 वा.च्या सुमारास सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने पाठलाग सुरू केला. या गस्ती नौकेतील अधिकारी मिरकरवाड्यातील त्या नौकेतील खलाशी, तांडेलना आवाज देवून थांबण्यास सांगत होते. परंतु, मासेमारी नौकेतील इंजिन, पंखा आणि वॉकिटॉकीच्या खरखर आवाजामुळे गस्ती पथकाकडून दिला जाणारा आवाज ऐकू आला नाही. त्यामुळे गस्ती नौकेने मिरकरवाड्यातील नौकेला मागून धडक दिली.

गस्ती नौकेच्या धडकेमुळे मासेमारी नौकेच्या पाठीमागे बांधलेली डिगी उलटली. या डिगीच्या मदतीने जाळे समुद्रात गोल पसरले जाते. डिगी उलटून दोन खलाशी समुद्रात पडले. त्यानंतर मासेमारी नौका थांबली आणि गस्ती पथकातील अधिकाऱ्यांनी रत्नागिरीच्या मासेमारी नौकेत चढून ताबा घेतला. गस्ती पथकातील काही अधिकाऱ्यांनी रत्नागिरीतील नौकेवरील तांडेलला बेदम मारहाण केली. त्याचबरोबर डिगी उलटून समुद्रात पडलेल्या खलाशांना वाचवण्यासाठी कोणतेही सहकार्य केले नाही. तांडेल व खलाशांना मारहाण करण्याचे अधिकार गस्तीनौकेवरील अधिकाऱ्यांना आहेत का ? हा जाब विचारण्यासाठी रत्नागिरीतील 40 ते 50 मच्छीमारांनी रत्नागिरीतील सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयावर गुरुवारी दुपारी धडक दिली.

सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचाही कार्यभार असल्याने ते रत्नागिरीतील कार्यालयात होते. यावेळी मच्छीमारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. सहाय्यक आयुक्तांनी यापुढे अशी चुक न होण्याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिले. डिगीतून समुद्रात पडलेल्या खलाशांना इतर नौकांनी वाचवले. खलाशांना पोहता येत असल्याने ते बालंबाल बचावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT