रत्नागिरी : पावसाळी बंदी काळातील मासेमारी रोखून मच्छीमारांच्या जीवित आणि वित्त रक्षणासह मत्स्य प्रजनन सुरक्षित राहावे यासाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाने पाच पथके गठित केली आहेत. ही पथके पावसाळी बंदीकाळातील कारवाईसाठी जाताना पोलिसांचेही सहकार्य घेणार आहे. बंदीकाळात मासेमारी करताना ज्या नौका पकडल्या जातील त्यांच्यावर परवाना रद्द करण्यासह डिझेल कोटा स्थगित करणे आणि नौकेवरील साहित्य जप्त करण्यासारखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत यांनी सांगितले.
पावसाळी मासेमारी बंदी १ जून ते ३१ जुलैपर्यंत असून पावसाळा नियमित सुरू होत नाही तोपर्यंत अनेक मच्छीमार नौका मासेमारीसाठी समुद्रात जातात. पावसाळी बंदीकाळात समुद्रातील वातावरण धोकादायक असते. त्यामुळे मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकेसह नौकेवरील खलाशी, तांडेल आणि पागींचा जीव धोक्यात असतो.
त्याचबरोबर हा कालावधी मत्स्य प्रजननाचा असल्यामुळे मासेमारी मत्स्य जीवित क्रमासही हानिकारक असते. या पार्श्वभूमीवर सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत यांनी गस्तीसाठी पाच पथके तयार केली आहेत. पथकात सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसह सुरक्षा पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, सागर मित्र यांचा समावेश आहे.