प्रतिकूल हवामानामुळे मासळी झाली मिळेनाशी! 
रत्नागिरी

Ratnagiri Fishing : प्रतिकूल हवामानामुळे मासळी झाली मिळेनाशी!

समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे रोप तुटून मासेमारीची जाळी समुद्रात अडकण्याचे प्रकार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने मच्छीमार नौकांना गेल्या चार दिवसांपासून मासळीच मिळत नाही. खोल समुद्रातही हीच अवस्था आहे. रोजच्या खर्चाइतकीही मासळी मिळेनाशी झाली आहे. उलट वाऱ्यामुळे रापणाचे रोप तुटून नुकसान होत असल्याचे मच्छीमार सचिन खेत्री यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. जिल्ह्यात सुमारे 3 हजार 387 मच्छीमार नौका आहेत. यातील पर्ससीन किंवा यांत्रिकी नौका साडेबारा नॉटीकल मैलच्या बाहेरील समुद्रात जाऊन मासेमारी करत आहेत. इतर नौका साडेबारा नॉटीकल मैलच्या आत मासेमारी करत आहेत. परंतु कोणत्याच नौकाना खर्चाइतकी मासळी मिळेनाशी झाली आहे. दोन-तीन दिवसांसाठी समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकाना अवघे तीन ते चार टपच मासळी मिळत आहे. यामध्ये फिशमिल कंपन्यांसाठी लागणारी छोटी मासळी मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

मासेमारी करणाऱ्या नौकाना इंधन, खलाशांचे रेशन पाणी भरून देणे त्याचबरोबर खलाशांचे आठवड्याचे पगार देण्याचा खर्च असतो. हा खर्चही सुटत नसल्याचे मच्छिमार खेत्री यांनी सांगितले. उलट समुद्रात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रापणाचे रोप तुटण्याचे प्रकार घडून ते रापण जाळे समुद्रात अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत. लाखो रुपये किमतीची जाळी किंवा रापण यामुळे नादुरुस्त होत आहेत. रोप तुटून समुद्रात अडकलेली रापण काढण्यासाठीही खर्च करावा लागतो. त्यानंतर त्या जाळ्यांच्या दुरूस्तीचा खर्च असतो. रापणीचा केवळ रोप तुटला तर तो जोडून घेता येतो. परंतु रोप तुटून रापण जाळे समुद्रात अडकले तर मोठे नुकसान होत असते. समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे एकीकडे रापण जाळ्यांचा खर्च वाढत असतानाच मासळीही मिळत नाही. त्यामुळे मच्छीमार आर्थिक अडचणीत येवू लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT