हर्णे बंदरात मासळीचे दर तेजीत 
रत्नागिरी

Ratnagiri News : हर्णे बंदरात मासळीचे दर तेजीत

पापलेट ८०० ते ९०० रुपये किलो, सुरमईही ७०० ते ९०० रुपयांवर; पर्यटकांसह खवय्यांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण शिंदे

दापोली : दिवाळी संपल्यानंतर कोकणातील पर्यटनाला पुन्हा वेग आला असून, पर्यटकांची पावले प्रसिद्ध दापाेली तालुक्‍यातील हर्णे बंदराकडे वळू लागली आहेत. समुद्रकिनाऱ्यांची भटकंती, निसर्गरम्य वातावरण आणि ताज्या मासळीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक हर्णे बंदराला पसंती देत आहेत. पर्यटकांच्या वाढत्या ओघामुळे हर्णेतील मासळी बाजारपेठेतही तेजीचे चित्र पाहायला मिळत आहे.

हर्णे बंदरातील बाजारपेठेत सध्या पापलेटचे दर ८०० ते ९०० रुपये, तर सुरमईचे दरही ७०० ते ९०० रुपये किलोच्या दरम्यान आहेत. जाडी कोळंबी ३०० रुपये, टायनी कोळंबी १०० रुपये, बांगडा १५० ते २०० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे मासळी खरेदी करताना ग्राहकांना खिशाचा विचार करावा लागत असला, तरी ताज्या मासळीला चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.

दिवाळीनंतर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने हर्णे परिसरातील हॉटेल, खानावळी आणि स्थानिक मासळी विक्रेत्यांच्या व्यवसायालाही चालना मिळत आहे. अनेक पर्यटक थेट हर्णे बंदरात जाऊन ताजी मासळी खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.

समुद्रातील मासळीची आवक आणि बाजारपेठेतील मागणी यानुसार दरांमध्ये चढ-उतार होत आहेत. सध्या मासळीचे दर चढे असले तरी पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आगामी काळात पर्यटनाची लगबग कायम राहिल्यास मासळी बाजारपेठेतील उलाढालीलाही आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

हर्णे बंदरातील मासळीचे दर (प्रतिकिलो)

पापलेट ८०० ते ९००

सुरमई ७०० ते ९००

जाडी कोळंबी ३००

टायनी कोळंबी १००

बांगडा १५० ते २००

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT