रत्नागिरी : वेल्डींगचे काम सुरु असताना तोल जाऊन कामगार विद्युतभारीत तारांवर पडून नंतर कंपाऊंडच्या काटेरी तारांमध्ये अडकून गंभीर जखमी झाल्याची घटना मिरजोळे एमआयडीसीमध्ये बुधवारी सायंकाळी ४ वाजता घडली. एमआयडीसीच्या अग्निशमन पथकाने या कामगाराला गंभीर अवस्थेत तारांमधून खाली काढत जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
पानवल घवाळीवाडी येथील रोशन घवाळी हा ३५ वर्षीय तरुण मिरजोळे एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक पी २४ येथे अब्दुल रहमान अन्सारी यांच्या घराजवळ वेल्डींगचे काम करीत होता. घरावर पत्रा लावत असताना त्याचा तोल जाऊन तो थेट एफसीआय गोडावूनच्या भिंतीपलिकडे विद्युतभारीत एक्सटेशन वायरवर पडला आणि त्याला शॉक लागला. यावेळी तो कंपाऊंडच्या सुरक्षेसाठी लावलेल्या काटेरी तारांमध्ये अडकून पडला. यात त्याची पाठ पूर्णपणे काळी पडली. या घटनेची माहिती तातडीने मिरजोळे एमआयडीसीतील अग्नीशमन दलाला देण्यात आली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी मोठ्या मेहनतीने तारांमध्ये अडकलेल्या रोशन घवाळी याला त्यातून सोडवून बाहेर काढले. यात त्याच्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
एमआयडीसी अग्नीशमन दलाचे आनंद राऊत, दिलीप दळवी, हर्षल आखाडे, प्रमोद राठोड, यतीराज मोरे, ओम यादव, शुभम गायकवाड यांनी या तरुणाला बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली. या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे.