अन्‍न व औषध विभागाची मिठाईसह विविध दुकानांवर करडी नजर  
रत्नागिरी

Ratnagiri News : गणेशोत्‍सवात एफडीएचा दणका; ३ परवाने निलंबित

एकाचा व्‍यवसाय बंद करण्‍याचे दिले आदेश; ३५ हजार रुपयांचा दंड वसूल, मैदा, मँगो पल्‍प जप्‍त

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : गणेशोत्‍सवात अन्‍न व औषध विभागाची मिठाईसह विविध दुकानांवर करडी नजर होती. १ सप्‍टेंबर ते १८ सप्‍टेंबर दरम्‍यान अन्‍न व औषध विभागाच्‍या वतीने जिल्‍ह्यातील ३ परवाने निलंबीत करण्यात आले आहेत, तर एकाचे व्‍यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भेसळ करणाऱ्यांकडून ३५ हजारांचा दंड आकारण्यात आला असून ३६ हजार ८५० रुपयांचा मैदा, मँगो पल्‍प साहित्‍य जप्‍त करण्यात आला आहे.याचबरोबर संशयीत खवा, मिठाई, तेल, तुपासह विविध नमुन्‍यांची तपासणी करून त्‍याचा अहवाल पुण्याला पाठवला आहे, तर ५ जणांना सुधारण्याची नोटीस देण्यात आली आहे.

अन्‍न व औषध प्रशासनाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्‍वीकारल्‍यापासून अन्‍नपदार्थात भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कारवाइचे सत्र सुरूच आहे. गणेशोत्‍सवासह सणासुदीच्‍या काळात अन्‍न व औषध विभागाच्‍या वतीने नियमावाली जाहीर केली होती. भेसळ केल्‍यास आणि नियमांचे उल्लघन केल्‍यास कारवाईचे आदेश देण्यात आले होते. असे असतानाही काहीजण भेसळयुक्‍त पदार्थ विक्री करीत आहेत. सणासुदीच्‍या काळात हे प्रकार अधिक वाढल्‍यामुळे अन्‍न व औषध विभागाने तपासणी मोहीम अविरतपणे सुरूच ठेवली आहे.

रत्‍नागिरी एफडीएचे वतीने जिल्‍ह्यात १८ सप्‍टेंबरपर्यंत एकूण २६ तपासण्या केल्‍या. त्‍यापैकी दूध ६, खवा २, घी २, तेल ४, मिठाई १२, इतर २० असे एकूण ४६ अन्‍नाचे नमुने घेण्यात आले. त्‍यापैकी काहींना सुधारणाची नोटीस देण्यात आली, तर काही दुकानांवर कारवाई झाली. १७ हजार ५०० किमतीचा ५०० किलो मैदा, १९ हजार ३५० रूपये किंमतीचा ६४५ किलो मँगो पल्‍प जप्‍त करण्यात आले. ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्‍यान, ही मोहीम अशीच सुरू राहणार असून दुकानदारांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा दंडात्‍मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

नवरात्र, दसरा, दिवाळीत तपासणी सुरूच राहणार

गणेशोत्‍सवानंतर लवकरच नवरात्र उत्‍सव सुरू होणार आहे. त्‍यानंतर दसरा, दिवाळी हे मोठे सण आहेत. याकाळात उपवासाचे पदार्थ, मिठाईमध्ये भेसळ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे रत्‍नागिरी अन्‍न व औषध विभाग सतर्क झाले असून ही मोहीम अशीच सुरू ठेवण्यात येणार आहे. मिठाई उत्‍पादक, मावा विक्रेते, हॉटेल्‍स, रेस्‍टाॅरंटसची कसून तपासणी केली जाणार असल्‍याचे सांगण्यात आले.

गणेशोत्‍सवात अन्‍न व औषध विभागाच्‍या वतीने नेमलेल्‍या पथकाकडून अचानक धाडी टाकून तपासणी करण्यात आली. संशयित नमुन्‍यांची तपासणी करून ३५ हजारांचा दंड वसूल केला, तर ३६ हजारांचा साहित्‍य जप्‍त करण्यात आला आहे. ३ परवाने निलंबित, तर एकाचा व्‍यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढेही मोठे सण असून हॉटेल, दुकानदारांनी दिलेल्‍या नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाई होणार आहे.
- ललित गायकवाड, अन्‍न सुरक्षा अधिकारी, रत्‍नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT