खेड : कोकणात शेती व्यावसायिक नसून वर्षभरासाठी लागेल एवढे तांदूळ मिळतील अशा प्रकारे पारंपरिक भातशेती व त्यानंतर पावटे, कडवे व तूर यांची शेती केली जाते. मात्र यावर्षी अवकाळी पावसाने दोन्ही पिकांचे 90 टक्के नुकसान केले आहे. तयार झालेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतात कडधान्य पेरण्यासाठीदेखील हवामान अनुकूल नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार 1 नोव्हेंबरच्या पावसात शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत.
तालुक्यातील शेतकरी व बागायतदार धास्तावले आहेत. अवेळी पावसामुळे नुकतेच कापणीला आलेले भातपीक पुन्हा बाधित झाले आहे. गेल्या आठवडाभरात संध्याकाळच्या सरीने अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणी साचून पिके आडवी झाली, तर काही ठिकाणी भाताचे रोप पूर्ण तुटून चिखलात गेली आहेत. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम अद्याप प्रगतीपथावर आहे. परिणामी यावर्षी भात उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून नवीन पंचनामे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भातशेती नंतर कोकणात पावटा, कडवा, तूर आदींची शेती हिवाळ्यात केली जाते. मात्र काही दिवस हलक्या सरी बरसण्याची शक्यता शेतकर्यांच्या मनात भीतीचे सावट निर्माण करत आहेत.
स्थानिक शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे भाताचे पीक चिखलात रुतले आहे. काही ठिकाणी कापणी केलेले भातपिकाला नवीन कोंब आलेले आहेत. या परिस्थितीत उत्पादनात 80 टक्केपर्यंत घट होऊ शकते दरम्यान अजूनही तालुक्यात पावसाच्या सरी सुरू आहेत. पुढील काही दिवस हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे कापलेले भातपीक वाळणे व कडधान्य पेरणे याबाबत शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
तालुक्यात में ते सप्टेंबर 2025 या पाच महिन्याच्या कालावधीतही पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी 45 गावातील 245 शेतकर्यांचे 4 लाख 88 हजार 755 रुपयांचे नुकसान झाले होते. एकूण 47.75 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद झाली होती. त्यापैकी जून ते ऑगस्ट महिन्यातही नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांना वितरित करण्यात आली आहे. पूर असो किंवा अतिवृष्टी कोकणात जरी नुकसान झाले तरी राज्य सरकार येथील जनतेच्या तोंडाला पानेच पुसत आले आहे. त्यामुळे ही उपेक्षा कोकणातील लोकप्रतिनिधी या ओल्या दुष्काळात तरी दूर करतील, अशी भाबडी अपेक्षा जनतेला आहे.
दरम्यान, गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या पावसामुळे कापलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या संकटातून शेतकरी वर्ग सावरणे कठीण आहे. या परिस्थितीत शासनस्तरावरून मदत मिळणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया आष्टी येथील शेतकरी वहाब सेन यांनी दिली.
कोकणात गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने भातशेती, कडधान्य शेती व लहरी हवामानामुळे आंबा, काजू बागायती शेती उद्ध्वस्त झाली आहे. जिल्हाधिकारी यांनी बांधावर जाऊन पाहणी केली आहे. त्यामुळे त्यांनी नुकसानीचे पंचनामे न करता कोकणातील सर्वच शेतकर्यांना तातडीची मदत मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी कोकणातील परिस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी तातडीने सरकारकडे पाठवावा, असे आवाहन शेतकर्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपुरकर यांनी केले आहे.
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. हवामान स्थिर झाल्यानंतर अचूक आकडे निश्चित करून शासनाकडे अहवाल पाठवला जाईल. येत्या चार दिवसांत नुकसानीचा अहवाल पूर्ण होईल-रवींद्र माळी, तालुका कृषी अधिकारी