चिपळूण : नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याचा तोतया पोलीस अधिकारी बनून चिपळूण तालुक्यातील बामणोली येथील एका ज्येष्ठ डॉक्टरला तब्बल २३ लाख ९५ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दि. ३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबरदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात त्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या सायबर फसवणुकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बामणोली डिंगणकरवाडी येथील ६५ वर्षीय डॉ. विलास महादेव ओक यांनी यासंदर्भात चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संजय पिसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय पिसे अशी ओळख सांगणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने थेट पोलिसांचा गणवेश परिधान करून डॉ. ओक यांच्याशी व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. आपण नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवून, डॉक्टरांच्या नावावर असलेल्या एअरटेलच्या सिम कार्डविरोधात तब्बल २० जणांनी तक्रारी दाखल केल्याचा दावा त्याने केला. एवढ्यावरच न थांबता डॉक्टरांच्या बँक खात्यावरून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मनी लाँडरिंग झाल्याची गंभीर भीती दाखवत तब्बल २३ लाख ९५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. ओक यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी संजय पिसे नावाच्या अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती -तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.