बनावट नोटाप्रकरणी चिपळूण परिसरातील चार ते पाच संशयितांना अटक 
रत्नागिरी

रत्नागिरी : बनावट नोटा चिपळूणमध्ये व्यवहारात?

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : बनावट नोटाप्रकरणी चिपळूण परिसरातील चार ते पाच संशयितांना मुंबईतील गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यानंतर आता या बनावट नोटा कुठे वापरात आणल्या गेल्या आहेत व या रॅकेटमध्ये आणखी कितीजणांचा समावेश आहे याचा शोध मुंबई पोलिसांना घ्यावा लागणार आहे. तसेच हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चिपळूण बाजारपेठेत काहीजणांकडे 500 च्या बनावट नोटा व्यवहारातून आल्याचे हळूहळू उघड होऊ लागले आहे. यामुळे चिपळुणातील व्यापारी व अनेक नागरिक आता 500 च्या नोटा तपासून घेऊ लागल्या आहेत.

बनावट नोटाप्रकरणी मुंबईच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या संशयितांची आर्थर रोड तुरंगात रवानगी केल्याची माहिती मिळत आहे. तर संशयितांकडून छापलेल्या बनावट नोटा या व्यवहारात कशा पद्धतीने आणल्या गेल्या? या संपूर्ण व्यवहारामध्ये अन्य कोणाचा आणि कितीजणांचा सहभाग आहे? याचा शोध आता पोलिस पथकाकडून गोपनीय पद्धतीने सुरू झाला आहे. संशयितांकडून स्वतंत्र चौकशीच्या माध्यमातून माहिती घेतली जात आहे. सराईत संशयितांकडून पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने माहिती उघड होत आहे.

दरम्यान, संयशितांमधील काही सराईतांकडून या नोटा सावकारी व्यवहारात वापरल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सावकारी करणार्‍यांकडून उचल घेतलेल्या रकमेची परतफेड आणि वसुली या माध्यमातून या बनावट नोटा व्यवहारात आणल्या गेल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे. व्यवहारात आणण्यासाठी सावकारी व्यवहार हे सोपे माध्यम असल्याचे बनावट नोटा प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी चांगले हेरले असल्याची चर्चा आहे. त्यातूनच सावकारांकडून रक्कम उचल करायची आणि ती परतफेडन होता त्या बदल्यात अन्य उचल घेणार्‍यांची वसुली करून सवलत मागायची आणि त्या बदल्यात सावकारी रक्कम घेतलेल्या अन्य व्यक्तीकडून वसुली झाल्याचे दाखवत बनावट नोटा व्यवहारात आणण्याची शक्कल लढविली गेल्याची चर्चा सुरु आहे.

या बनावट नोटांमध्ये 100, 200 व 500 रूपये रकमेच्या नोटांचा समावेश असल्याचे सांगितले जात असून बाजारपेठेत सध्या या रकमेच्या नोटा व्यापार्‍यांसह ग्राहकांकडून तपासून घेतल्या जात आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काही व्यापारी व ग्राहकांनी आपल्याकडील वरील रकमेच्या नोटांची तपासणी केली असता प्रामुख्याने काहींच्या व्यवहारातून 500 च्या बनावट नोटा मिळाल्याचे उघड झाले आहे. एकूणच बनावट नोटांचे रॅकेट आणि व्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याचे सांगितले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT