रत्नागिरी : बाजारपेठेत व्यापाऱ्यांची झालेली गर्दी 
रत्नागिरी

Ratnagiri News| जत्रेत यंदा आपत्कालीन मार्ग मोकळे!

व्यावसायिकांना आखून दिलेल्या रेषेतच दुकाने थाटण्याचे बंधन

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरीतील विठ्ठल मंदिराच्या कार्तिकी एकादशी जत्रेत यंदा आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवण्याच्या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. व्यावसायिकांना आखून दिलेल्या रेषेच्या आतच दुकाने थाटण्याचे बंधन घालण्यात आल्याने पतितपावन मंदिर, काँग्रेस भवन परिसर ओलांडून मांडवी मार्गापर्यंत जत्रेतील दुकानांचा विस्तार झाला. गेल्यावर्षी ही दुकाने गाडीतळ ते काँग्रेस भवन परिसरापुरतीच मर्यादित होती. गेल्या वर्षी जत्रेत व्यापाऱ्यांनी रस्त्यांवर दुकाने थाटल्याने नागरिक आणि ग्राहकांना ये-जा करताना मोठी गैरसोय झाली होती. गर्दीमुळे चेंगराचेंगरीची शक्यताही निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा नगरपरिषद, बाजारपेठेतील व्यापारी आणि पोलिसांनी संयुक्त नियोजन केले.

पटवर्धन हायस्कूल ते पऱ्याची आळी, मारुती आळीतील मंदिराजवळचा पार्किंग मार्ग आणि गाडीतळ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळील एकमार्ग आपत्कालीन वाहतुकीसाठी मोकळा ठेवण्यात आला. नगरपरिषदेचे अधिकारी विजय कदम, जितेश पोवार आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने मार्गातील दुकाने हटवून नियोजनाची अंमलबजावणी केली.

शुक्रवारी रात्री २ वाजल्यापासून विठ्ठल मंदिरात पूजाअर्चा सुरू झाली शनिवार मध्यरात्री पालखी-रथ मिरवणुकीला सुरुवात होईल. धनजी नाका दर्ग्याजवळ आरती झाल्यानंतर मिरवणूक रामआळी, तेलीआळी आणि मारुती आळीमार्गे विठ्ठल मंदिरात येईली. तेथून पालखी श्रीदेव भैरी मंदिरात नेण्यात येईल. हा कार्यक्रम पहाटे ६ वाजेपर्यंत चालतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT