चिपळूण शहर : चिपळूण तालुक्यातील चिवेली बौद्धवाडी येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेत ३२ लाख ९४ हजार ३९० रुपयांचा आर्थिक अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत स्तरावरील समितीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१३-१४ मध्ये जिल्हा परिषद रत्नागिरीच्या माध्यमातून ग्रामपंचायत चिवेली बौद्धवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेची निवड करण्यात आली होती. या योजनेसाठी ४८ लाख ८९ हजार ५३३ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान आर्थिक अनियमितता झाल्याची तक्रार पुढे आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी शैलेश वसंत बटाला यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती नियुक्त करण्यात आली होती.
या समितीने केलेल्या चौकशीमध्ये तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता संदेश दामोदर जंगम, तत्कालीन कार्यकारी अभियंता ए. डी. पांडकर, तत्कालीन शाखा अभियंता रमेश चोखाजी कांबळे, चिवेली ग्रामआरोग्य, पोषण व पाणीपुरवठा समितीचे तत्कालीन अध्यक्ष नंदकिशोर दत्तात्रय शिर्के आणि सचिव राजेश शिवाजी भोसले यांनी एकमेकांच्या संगनमताने अनियमितता केल्याचे नमूद करण्यात आले आहे. मोजमाप पुस्तिकेत खोट्या नोंदी करणे, प्रत्यक्ष काम पूर्ण झालेले नसतानाही काम पूर्ण झाल्याची प्रमाणपत्रे व अहवाल सादर करणे, अशा प्रकारे शासनाची ३२ लाख ९४ हजार ३९० रुपये ९७ पैसे इतक्या रकमेची फसवणूक केल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.
या चौकशी अहवालाच्या आधारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी आदेश जारी करून चिपळूण ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता डॉ. दिगंबर बाळासाहेब पाटील यांना संबंधित प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार डॉ. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदेश दामोदर जंगम, ए. डी. पांडकर, रमेश चोखाजी कांबळे, नंदकिशोर दत्तात्रय शिर्के आणि राजेश शिवाजी भोसले या पाच जणांविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय निधीच्या वापरात झालेल्या या कथित गैरव्यवहारामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.