देवरुख : सर्पदंश झालेल्या वृद्ध महिलेवर देवरुख ग्रामीण रुग्णालयात वेळीच डॉक्टर उपलब्ध नसल्याने व तत्काळ उपचार न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयात एकच हंगामा केला. यावेळी पोलिसांनी जमावाला शांत केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे कुळयेवाडी येथील अनुसया शिगवण (वय ८५) या दुपारी ३.३० वाजता घराजवळील लाकडाच्या खोपीतून लाकडे काढत असताना विषारी सर्पाने त्यांच्या हातावर दंश केला. त्यांनी आरडाओरड करताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ ४.१५ वाजता देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र यावेळी रुग्णालयात सेवेत असलेले डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे या महिलेवर उपचार होऊ शकले नाहीत.
काही वेळानंतर ड्युटी संपवून गेलेले डॉ. यादव रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी या महिलेची तपासणी सुरु केली. मात्र तोपर्यंत या वृद्ध महिेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना कळताच उपनिरीक्षक जाधव फौजफाट्यासह रुग्णालयात दाखल झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव यांनी उपस्थित डॉक्टरांची चांगलीच खरडपट्टी काढत रुग्णालयात यापुढे २४ तास डॉक्टर असलेच पाहिजेत, अशी मागणी केली.