शैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी अग्रेसर असल्याचा अभिमान 
रत्नागिरी

Uday Samant : शैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी अग्रेसर असल्याचा अभिमान

पालकमंत्री सामंत यांचे गौरवोद्गार; मालगुंड शाळा क्र.1 च्या अमृत महोत्सवी वर्ष उद्घाटन सोहळा

पुढारी वृत्तसेवा
वैभव पवार

गणपतीपुळे : शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रयोग होत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळातील शिक्षण आणि आताचे शिक्षण यात बराच मोठा फरक असून, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाचे काम करत असताना रत्नागिरी जिल्हा हा शैक्षणिकद़ृष्ट्या सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक स्वरूपासह प्रगत बनत आहे. काळाच्या ओघात रत्नागिरी जिल्हा हा भविष्यात शैक्षणिक हब बनणार असून, माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कालानुरूप शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असून, रत्नागिरी जिल्हा शैक्षणिकद़ृष्ट्या प्रगत होत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले. ते रत्नागिरी तालुक्यातील आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड क्र. 1 च्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी हा नररत्नाची खाण असून या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलेल्या महनीय व्यक्तिमत्त्व घडल्या आहेत. त्यांच्या आदर्शाना अनुसरून कार्य करण्याची आज समाजाला गरज आहे. आदर्श जीवन शिक्षण शाळेला 175 वर्षे होत आहेत, ही समस्त मालगुंडवासीयांना अभिमानाची बाब आहे. या शाळेचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. महत्वाचे म्हणजे पूर्वीच्या काळात असणारी साधने आणि आताची शैक्षणिक साधने यात प्रचंड बदल होत असून हे बदल समाजातील प्रत्येकाने स्वीकारण्याची आवश्यकता आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी हे बदल स्वीकारले पाहिजे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील हा बदल स्वीकारून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी पुढे आले पाहिजे. ज्या महामानवांनी हा देश उभारला त्यांच्या कार्याचा आदर्श समाजातील प्रत्येकाने घेत कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.

या शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या शुभारंभ कार्यक्रमाला ना. उदय सामंत यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष, समिती सदस्य आणि शाळा मुख्याध्यापक आदींच्या वतीने सन्मानपूर्वक य व यथोचित स्वागत करण्यात आले. त्या नंतर शाळेच्या मुख्य कार्यालयात शाळेविषयी आणि शतकोत्तर महोत्सबाबतची माहिती शाळेच्यावतीने नामदार उदय सामंत यांना देण्यात आली . त्यानंतर उदय सामंत यांच्या हस्ते शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सव वर्षाच्या लोगोचे अनावरण आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन आणि शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ फलकाचे अनावरण करण्यात आले. या शुभारंभ कार्यक्रमात 175 व्या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मालगुंड येथील महिला भगिनींनी मराठमोळ्या पेहरावामध्ये 175 दिव्यांनी नामदार उदय सामंत यांची ओवाळणी केली. त्यानंतर नामदार उदय सामंत यांनी या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये रममाण होऊन त्यांचेसमवेत फोटो काढून शतक महोत्सवी शुभारंभाचा आनंद द्विगुणित केला.

या शुभारंभ महोत्सव कार्यक्रमात शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या 175 व्या वर्षानिमित्त शतकोत्तर अमृत महोत्सव समितीने 175 वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्याचा शुभारंभ नामदार उदय सामंत आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी विश्वनाथ साळवी यांना वृक्ष लागवड करण्याचा मान देण्यात आला मान देण्यात आला. त्यानंतर मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयातील कै. सदानंद बळीराम परकर सभागृहात मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन ना. उदय सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शतकोत्तर अमृतमहोत्सवी समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. नामदार डॉ. उदय सामंतव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड क्रमांक 1 मधील ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून समितीचे सदस्य गजानन पाटील यांनी सनावळीसह शाळेचा इतिहास सांगत, शाळेत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाचा आढावा घेऊन, या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमाचे स्वरूप सांगून पालकमंत्री डॉ. उदय सामंत साहेब यांना शाळेच्या विकसनासाठी विनंती केली. यावेळी उपस्थित असणारे शतकोत्तर अमृतमहोत्सवी समितीचे सदस्य सुनील मयेकर यांनीही शाळेच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी सांगून शाळेचा विकास होण्यासाठी सामंत यांनी लक्ष देण्याची विनंती केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT