रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ ही २८ जून रोजी रत्नागिरीत होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण १२ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून एकूण विद्यार्थी ६ हजार ६२२ तर शिक्षक सेवेत असलेले ३ हजार ३८३ शिक्षक परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा यशस्वीपणे घेण्यासाठी योग्य नियोजन शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी चार ते पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. २८ जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 या कालावधत पहिला पेपर होईल. त्यानंतर लगेचच दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुसरा पेपर घेतला जाणार आहे.
परीक्षा सुरळीत होण्यासाठी जिल्हा परीक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. पहिला पेपर 2 हजार 881, तर दुसरा पेपर 3 हजार 741 विद्यार्थी देणार आहेत. मराठी माध्यमचे 2 हजार 2204, इंग्रजी माध्यम-124, उर्दू- 219, हिंदी -2098 असे एकूण 4 हजार 645 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
या केंद्रावर होणार परीक्षा
अभ्यंकर कुलकर्णी ज्यु. कॉलेज, पाठक हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, आर. बी. शिखरे हायस्कूल, ए. के. देसाई हायस्कूल, एम. एस. नाईक हायस्कूल, श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी मिडीयम स्कूल, जागुष्टे हायस्कूल, मिस्ट्री हायस्कूल, एजाज दाऊद नाईक हायस्कूल, सॅक्रेड सिटी कॉनवेंट हायस्कूल, श्री महालक्ष्मी हायस्कूल या 12 केंद्रांवर परीक्षा होणार आहेत.