रत्नागिरी : राज्यात पहिल्यांदाच राबवण्यात येणार्या केंद्रीय ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेत शिक्षण संचालनालयाला अद्यापही समन्वय साधता आलेला नाही. प्रारंभिक वेळापत्रकानुसार अंतिम गुणवत्ता यादी रविवारी (दि. 8 जून) जाहीर होणार होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे शिक्षण विभागाने पुन्हा वेळापत्रक बदलत ही यादी आता बुधवारी (दि. 11) प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, वेळापत्रकातील वारंवार बदल, दुरुस्तीनंतर शुद्धीपत्रक, तसेच विभागाच्या निर्णयातील अनिश्चितता यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
2025-26 या शैक्षणिक वर्षापासून राज्यात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे देण्यात येत आहेत. त्यात वेबसाईट ठप्प होण्याचा सावळा गोंधळ संपतो न संपतो तोच दररोज नवनवीन निर्णय, मुदतवाढ, निर्णयातील दुरुस्त्या शुद्धीपत्रक यांची मालिका थांबण्याचे नाव नाही. विद्यार्थ्यांना अर्ज भाग 2 (कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम) भरण्यासाठी पूर्वीच्या 2 जून रोजीच्या वेळापत्रकानुसार एक दिवसाचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला. कारण 84 हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 1 भरला, पण भाग-2 लॉक केला नव्हता. अशा विद्यार्थ्यांकरिता एक दिवसाचा अधिकचा कालावधी शनिवार (दि. 7)पर्यंत दुपारी 12.30 पर्यंतचा वेळ देण्यात आला. आता पुन्हा रविवारी (दि. 8) शिक्षण संचालनालयाने नवीन वेळापत्रक जाहीर केले.
आता सुधारित वेळापत्रकानुसार 7 ते 9 जून दरम्यान यादीवरील आक्षेप नोंदवण्यास वेळ देण्यात आला आहे. यामुळे तात्पुरत्या गुणवत्ता यादीवरील सर्व आक्षेप नोंदविणे व ते निकाली काढणे यासाठी पुरेसा वेळ मिळणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. एकंदरीत 12 लाख 71 हजार प्राप्त अर्जावर अंतिम गुणवत्तायादी, व्यवस्थापन कोटा, इन-हाउस कोटा, अल्पसंख्याक कोटा आणि कॅप राउंडमधील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांचे अलोकेशन करण्यास तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.
व्यवस्थापन, संस्थांतर्गत, अल्पसंख्याक कोट्यांतर्गत विद्यार्थ्यास मिळालेले कॉलेज मान्य असेल तर ‘प्रोसिड फॉर अॅडमिनशन’वर क्लिक करणे. विद्यार्थ्याने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित कॉलेजमध्ये जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून विहित शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चिती.