खत खरेदी 
रत्नागिरी

Ratnagiri News : खरेदी प्रक्रिया सुलभ, शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार खत

‘एफएफएस’ ॲपद्वारे होणार आगाऊ बुकिंग; दुकानात फक्त क्यूआर कोड दाखवताच शेतकर्‍यांना मिळणार खत

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : खत खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि जलद करण्यासाठी केंद्र शासनाने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ (FFS) हे नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या आपल्या गरजेनुसार खतांची आगाऊ नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर निवडलेल्या दुकानात क्यूआर कोड किंवा टोकन दाखवून खत घेता येणार असल्याने दुकानांसमोरील रांगा आणि प्रतीक्षेचा त्रास कमी होणार आहे. कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत या प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर २५ ऑगस्टपासून रत्नागिरी जिल्ह्यातही ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना जमिनीचे क्षेत्रफळ व पिकाचा प्रकार नोंदवल्यानंतर आवश्यक खताची मात्रा (GFR) शास्त्रीय पद्धतीने निश्चित करण्यास मदत होणार आहे. परिसरातील अधिकृत परवानाधारक विक्रेत्याची निवड शेतकऱ्यांना करता येईल. अनुदानित खतांचा गैरकृषी वापर, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासही या प्रणालीची मदत होणार आहे. युरिया, डीएपीवर खरेदी मर्यादा जमिनीचे आरोग्य जपणे आणि युरियाचा अतिवापर टाळण्यासाठी शासनाने प्रति शेतकरी, प्रति हेक्टर, प्रति हंगाम जास्तीत जास्त ५ गोण्या युरिया आणि ४ गोण्या डीएपी खरेदीची मर्यादा निश्चित केली आहे.

आधारशी मोबाईल लिंक आवश्यक FFS ॲप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असून त्यासाठी इंटरनेटसह स्मार्टफोन आणि आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. राज्य निवडल्यानंतर फार्मर आयडी किंवा आधार क्रमांकाद्वारे OTP घेऊन लॉगिन करता येते. फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांची जमिनीची माहिती आपोआप उपलब्ध होईल. आयडी नसल्यास कुळ किंवा मालकी हक्क निवडून सर्व्हे क्रमांकासह जमिनीचा तपशील भरावा लागेल. यानंतर पिकाची निवड करून आवश्यक खताचा प्रकार व गोण्यांची संख्या निश्चित करावी लागेल. खत घेण्यासाठी स्वतः जाणार की प्रतिनिधीला पाठवणार, याची नोंद करून जवळच्या विक्रेत्याची निवड करता येईल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळणारा क्यूआर कोड व टोकन क्रमांक सुरक्षित ठेवावा. खत घेण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीकडे मूळ आधारकार्ड आणि बुकिंगचा क्यूआर कोड असणे आवश्यक आहे.

तालुकानिहाय हेल्पडेस्कॲप वापराबाबत अडचण अथवा तक्रारींसाठी कृषी विभागाने तालुकानिहाय हेल्पडेस्क सुरू केले आहेत. रत्नागिरीसाठी राजेंद्र कुंभार, राजापूरसाठी विद्या तिष्टक (९१८४२०८०६४), लांजासाठी सुभाष गुरव, चिपळूणसाठी भीमाशंकर कोळी, गुहागरसाठी कपिल चिंगळे, संगमेश्वरसाठी चंद्रकांत कोळी व पी. एस. सुर्वे, दापोलीसाठी वर्षा गोरीवले व श्वेता शिंदे, खेडसाठी जगदीश शिंदे आणि मंडणगडसाठी घनश्याम अभंग यांच्याशी संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी जवळच्या खत विक्रेत्यांशी, तालुका व मंडळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT