रत्नागिरी : परतीच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपायला सुरुवात केली असून रविवारी दिवसभरात 533.16 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात 92. मि.मी. झाला आहे. दरम्यान, सोमवार, मंगळवारी सलग दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाडा, विदर्भ, सोलापूर जिल्ह्यात एकीकडे परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून महापूर आला आहे. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात ही परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. दिवसा संततधार तर रात्री मुसळधार पाऊस पडला आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पावसाने जिल्ह्यात दमदार बॅटिंग केली. रविवारी मंडणगडात 88.75 मि.मी., खेड-92 मि.मी., दापोली 90 मि. मी., चिपळूण 51.67 मि.मी., गुहागर 59.60 मि.मी., संगमेश्वर 56.33 मि.मी., रत्नागिरी 45.11 मि.मी., लांजा 29.20 मि.मी., राजापूर 20.50 मि. मी. असे एकूण 533.16 मि.मी. पाऊस झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 30 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर वाढणार असून वादळी वार्यासह, विजेच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाने पाऊस पडेल नागरिकांनी सतर्क रहावे, असेही आवाहन हवामान खात्याने केले आहे.