जिल्‍ह्यात यावर्षी गतवर्षीपेक्षा सरासरी ८५० मि.मी. कमी पाऊस! 
रत्नागिरी

Ratnagiri News : जिल्‍ह्यात यावर्षी गतवर्षीपेक्षा सरासरी ८५० मि.मी. कमी पाऊस!

१ जून ते १३ सप्‍टेंबरपर्यंत २ हजार ५७४ मि.मी. झाला पाऊस; २४ टक्‍के कमी पाऊस

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : कोकणातील रत्‍नागिरी जिल्‍ह्यात १ जून ते १३ सप्‍टेंबर म्‍हणजेच आज अखेर २ हजार ५७४ मि.मी. इतका तर ७६ टक्‍के पाऊस झाला आहे. तर गतवर्षी याच कालावधीत सरासरी ३ हजार ३८३ मि.मी. तर १०० टक्‍के पडला होता. पाच तालुक्‍यात १०० टक्‍के पाऊस झाला, मात्र यंदाच्‍या वर्षी अद्याप एकाही तालुक्‍यात शंभर टक्‍के पाऊस झालेला नाही. मागील वर्षीपेक्षा यंदा ८५० मि.मी. पाऊस कमी पडला आहे. जून, ऑगस्‍ट महिना जिल्‍ह्याला अनलकी ठरला तर जुलै महिना लकी ठरला असून मुसळधार पावसामुळे जिल्‍ह्यावरील पाणी संकट दूर झाले, एवढं मात्र निश्चित.

गतवर्षी जिल्‍ह्यात मे महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यापासून पावसाला सुरूवात झाली. पावसाने दमदार हजेरी लावली. त्‍यानंतर जून, जुलै या दोन महिन्‍यात पाऊसफुल्‍ल झाला. ऑक्‍टोबर महिन्‍यात पूरपरिस्‍थिती झाली होती. शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली. मात्र यंदाच्‍या वर्षी परिस्‍थिती उलट आहे. मान्‍सून वेळेत दाखल झाला, मात्र पाच ते सहा दिवसच चांगला पाऊस झाला. त्‍यानंतर पावसाने दडी दिली. जुलै महिन्‍यात खऱ्या अर्थाने पावसाने दमदार हजेरी लावली. एका आठवड्यात पाऊस धो-धो बरसला. त्‍यामुळे जून महिन्‍याचा बॅकलॉक भरून निघाला.

जिल्‍ह्यावरील पाणी टंचाई दूर झाली. १८ टँकर टप्‍प्‍याटप्‍प्‍याने बंद करण्यात आली. नद्या, धरणातील पाणी पातळी ओलांडली. खेड येथील जगबुडी नदीने धोकादायक पातळी ओलांडली होती. मात्र त्‍यानंतर ऑगस्‍ट महिन्‍यात पावसाने साफ निराशा केली. म्‍हणावा तितका पाऊस झाला नाही. पावसामुळे पिके पिवळी पडत होती. अखेर सप्‍टेंबर महिन्‍यात पावसाने संततधार का होईना पाऊस सुरू झाला. त्‍यानंतर आता तीन दिवस झाले. पावसाने विश्रांती घेतली आहे. एकंदरीत, कोकणात यंदा म्‍हणावा तितका पाऊस झाला नसून तब्‍बल सरासरी ८५० मि.मी. कमी पाऊस पडला आहे.

गतवर्षी पाच तालुक्‍यात शंभर टक्‍के पाऊस

गतवर्षी जिल्‍ह्यात मे महिन्‍यापासूनच पाऊस सुरू झाल्‍यामुळे पावसाने अक्षरश: जिल्‍ह्याला झोडपून काढले होते. जून ते सप्‍टेंबर आजअखेर खेड, गुहागर, चिपळूण, लांजा व राजापूर या पाच तालुक्‍यात १०० टक्‍क्‍यांहून अधिक पाऊस झाला होता. मात्र यंदाच्‍या वर्षी एकाही तालुक्‍यात १०० टक्‍के पाऊस अद्याप पडला नाही. खेड तालुक्‍यात आतापर्यंत ९२ टक्‍के सर्वाधिक पाऊस झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT