रत्नागिरी : मागील आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सोमवारपासून सुरू झालेली पावसाची संततधार मंगळवारीही सुरूच होती. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने धुवाँधार बॅटिंग केल्याने खेडमध्ये जगबुडी, संगमेश्वरात शास्त्री तर राजापुरात कोदवली नदी इशारा पातळीच्या वरती वाहत होत्या. मंडणगडसह संगमेश्वरमधील माखजन बाजारपेठेत या वर्षी दुसर्यांदा पाणी भरल्याने व्यापार्याची तारांबळ उडाली. रखडलेल्या शेतीच्या कामांनी मात्र वेग घेतला आहे.
जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार पाऊस पडत असून, नद्यांची पात्र आता ओसंडून वाहू लागली आहेत. सह्याद्रीच्या पट्ट्यातही मोठ्याप्रमाणात पाऊस पडत आहे. मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर काही भागात ओसरला होता. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. जिल्ह्यातील तीन नद्या इशारा पातळीवरुन वाहत असून, अन्य नद्यांची पाणी पातळीही वाढली आहे. प्रमुख नद्यांसह छोट्या नद्यांचे पाणी सखल भागातील भातशेतीत घुसल्याचे चित्रही काही ठिकाणी दिसून येत होते. गडनदीची पाणी पातळी वाढल्यामुळे माखजन परिसरात पाणी घुसले होते. या वर्षी दुसर्यांदा बाजारपेठेत पाणी आल्याने व्यापार्यांची मात्र धावपळ उडाली. शास्त्री नदीही इशारा पातळीवर वाहत होती. राजापूरमध्ये कोदवली नदीही इशारा पातळीवरुन वाहत होती. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. वाढत्या पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यात आले असून, वेळोवेळी नागरिकांना सूचना दिल्या जात आहे.
मागील चौवीस तासात जिल्ह्यात 1033.95 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये 114मिमी, खेड 96.85मिमी, दापोली 93.71मिमी, चिपळूण 134.56 मिमी, गुहागर 111.40 मिमी, संगमेश्वर 142.25 मिमी, रत्नागिरी 143.11 मिमी, लांजा 112.20मिमी, राजापूर 85.87मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्यानेही दुर्गम भागात मोठ्याप्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत असून, काही नद्यांचे पाणी इशारा पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी किनार्यांवर जाऊ नये, तसेच मोठ्या पावसामध्ये घराबाहेर पडू नये, सुरक्षितस्थळी रहावे. शक्य असल्यास घरामध्ये थांबावे अशा सूचना दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. प्रशासनालाही त्यांनी सूचना दिल्या आहेत. एनडीआरएफचे पथकही सजग असल्याचे त्यांनी सांगितले.