जिल्ह्यात सतर्कता; सुरक्षा उपाययोजना अधिक कडक 
रत्नागिरी

Ratnagiri News : जिल्ह्यात सतर्कता; सुरक्षा उपाययोजना अधिक कडक

दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने उचलली विशेष पावले

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी कारमध्ये स्फोट झाला होता. ज्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला व 20 हून अधिकजण जखमी झाले होते. याच बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिस दलामार्फत जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष पावले उचलण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर, संवेदनशील ठिकाणे, बाजारपेठा, रेल्वे स्थानक, बस स्थानके, धार्मिक स्थळे, लँडिंग पॉईंटस्‌‍, प्रमुख बंदरे, जेट्टी आदी दळण-वळणाच्या ठिकाणी कडक पोलिस गस्त, तपासणी व शोध मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेत स्थानिक पोलिस ठाणे, बॉम्ब शोध व नाश पथक यांच्या संयुक्तपथकांचा सहभाग आहे. तसेच प्रशिक्षित स्निफर डॉग्स यांचा वापर करून संशयास्पद वस्तू, वाहने अथवा व्यक्तींची सखोल तपासणी करण्यात येत आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारी व खाडी किनारी सरकारी व खासगी बोट, ट्रॉलरने पेट्रोलिंग करण्यात येत आहे व जिल्ह्यातील सर्व तपासणी नका येथे नाकाबंदी करण्यात आलेली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील समुद्र किनारी असणाऱ्या सर्व संवेदनशील कंपन्या, पोर्ट व गावे येथे सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिस ठाणे स्तरावर सागर रक्षक दल, सुरक्षा रक्षक व ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत व समुद्र मार्गाने उद्भवणारे संभाव्य धोके व दक्ष राहण्याबाबत माहिती व सूचना देण्यात आलेल्या आहेत.

...तर लगेच पोलिसांशी संपर्क साधा

रत्नागिरी पोलिस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचाली दिसल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यास किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक: 02352-222222, डायल-112 अथवा विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परीक्षेत्र यांचे अधिकृत ‌‘समुद्र संदेश‌’ व रत्नागिरी पोलीस दलाचे ‌‘रत्नागिरी पोलिस‌’ या चॅनलवर तत्काळ माहिती द्यावी किंवा कोस्टल हेल्पलाइन नंबर 1093 वर संपर्क साधावा. रत्नागिरी जिल्हा पोलिस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक ती काळजी घेत असून, जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण राखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT